शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा
By admin | Published: June 5, 2017 04:39 AM2017-06-05T04:39:35+5:302017-06-05T04:39:35+5:30
शेतकऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी सोमवारी, ५ जून रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी सोमवारी, ५ जून रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा असून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी माहिती शिवसेना सचिव आणि प्रवक्ते खासदार विनायक राऊत यांनी दिली.
महाराष्ट्र बंदबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, शिवसेनेने कायम शेतकऱ्यांसाठी लढा दिला आहे. सोमवारच्या संपाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. मोठ्या ताकदीनिशी शिवसैनिक संपात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला शिवसेनेचा पाठिंबा असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी संपाबाबत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या वेळी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना टाळून रात्री बैठक घेतली. प्रत्येक बाबतीत मोजक्याच मंडळींना बोलावून चर्चा करायची पद्धत योग्य नाही. सर्व शेतकरी झोपलेले असताना संप संपल्याचे जाहीर करण्यात आले. शेतकरी मागण्यांवर तातडीने निर्णय न घेता समिती नियुक्त करू, समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ असा वेळकाढूपणा करण्यात येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा तोडगा नाकारलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये दुही माजविण्याचाच हा प्रकार केला जात असल्याची टीकाही विनायक राऊत यांनी केली.