शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आधार दिंडी
By admin | Published: January 14, 2016 12:27 AM2016-01-14T00:27:53+5:302016-01-14T00:27:53+5:30
संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथाला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संतांची भूमी असलेल्या मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी वारकरी
औरंगाबाद : संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथाला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संतांची भूमी असलेल्या मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे मराठवाड्यातील ७६, तर अमरावती विभागातील ५६ अशा एकूण १३२ तालुक्यांतून ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’ काढण्यात येणार आहे. ‘लोकमत’ या दिंडीचा मीडिया पार्टनर आहे.
१८ ते ३० जानेवारी या कालावधीत एकाचवेळी तीन दिंड्या निघतील. प्रत्येक गावात व्याख्याने, कीर्तन व चर्चा असे कार्यक्रम होतील. एक दिंडी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथून, दुसरी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथून, तर तिसरी दिंडी नांदेडमधून निघेल. ही माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील व सचिव ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे यांनी दिली.
या दिंडींच्या माध्यमातून मराठवाड्यातून अत्यंत गरीब परिस्थितीतून उच्च पदस्थ झालेले अधिकारी, पत्रकार, उद्योजक व राज्यातील प्रगतिशील शेतकरी ग्रामीण भागातील चिंताग्रस्त, भयग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यांना मानसिक आधार देऊन जगण्याची उमेद निर्माण करण्याचे प्रयत्न करतील. त्याचबरोबर दिंडी ज्या गावात जाईल तेथे वारकरी संप्रदाय आधार समिती स्थापन करणार आहे. जेणेकरून संवादाचे काम कायम सुरू राहील.
शेती फायद्याची व्हावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून वारकरी साहित्य परिषदेने काही उपाय सुचविलेले आहेत. त्यामध्ये शेतीमालास उत्पादन खर्चानुसार हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची शासकीय व खासगी कर्जे माफ करावीत व त्यांच्या गहाण जमिनी त्यांना परत कराव्यात, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळावे, शेतमालप्रक्रिया उद्योग त्या-त्या भागात उभारावेत, शालेय पोषण आहार योजना व्यापक बनवावी, दुष्काळी भागातील ५ हेक्टरखालील शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, वीज व बैलजोडी व शेती अवजारे द्यावीत, अशा शेतकऱ्यांना मोफत गायींचा पुरवठा करावा, ५ हेक्टर खालील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन संच पुरवावेत, फलोत्पादनासाठी मागेल त्याच्यासाठी फळबाग योजना राबवावी, गावोगावी बेकार तरुणांच्या याद्या तयार करून त्यांना छोटे उद्योग उभारता यावेत यासाठी प्रशिक्षण व अर्थसाह्य द्यावे, चारा छावणीच्या हद्दीत सुविधांचे फलक स्पष्ट शब्दांत लावावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी
- मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये जाणारी दिंडी १८ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ८ वाजता नांदेड येथून निघेल. ही दिंडी अर्धापूर, हिमायतनगर, भोकर, उमरी, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, अहमदपूर, चाकूर, उदगीर, निलंगा, उमरगा, तुळजापूर, औसा, लातूर, रेणापूर, अंबाजोगाई, परळी, धारूर, कळंब, भूम, पाटोदा, बीड, वडवणी, कन्नड, वैजापूर, गंगापूर व खुलताबाद यामार्गे जाईल. ३० जानेवारी २०१६ रोजी औरंगाबादेत दिंडीचा समारोप होईल.
- पहिल्या दिंडीप्रमाणेच दुसरी दिंडी १८ जानेवारी २०१६ रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथून सकाळी ८.३० वाजता निघेल. तेथून नेर, यवतमाळ, राळेगाव, मोरगाव, वणी, पांढरकवडा, आर्णी, पुसद, माहूर, किनवट, उमरखेड, कळमनुरी, हिंगोली, पूर्णा, पालम, सोनपेठ, पाथरी, परभणी, सेनगाव, लोणार, मंठा, अंबड, जालना, सिंदखेडराजा, देउळगावराजा, बदनापूर, फुलंब्रीमार्गे औरंगाबादेत येईल. तिसरी दिंडी १८ जानेवारी २०१६ रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथून निघेल. तिन्ही दिंड्यांचा समारोप ३० जानेवारी २०१६ रोजी होईल.
- वारकरी संप्रदाय व वारकरी साहित्य परिषद यांनी शेतकरी व इतरांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन तयार केले आहे. ते शासनाला सादर केले जाणार आहे. प्रगतशील, पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा प्रगतिपथाकडे नेण्यासाठी वारकरी परिषदेच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी परिषदेने केली.
- वारकरी परिषदेच्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील व सचिव ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे यांनी केले आहे.