एडसग्रस्तांना मदतीचा आधार
By admin | Published: July 22, 2014 12:38 AM2014-07-22T00:38:08+5:302014-07-22T00:38:08+5:30
राज्यातील पहिलाच प्रयोग
अकोला: एडसग्रस्तांचा शोध घेऊन, त्यांना मदतीचा आधार देण्याचा उपक्रम अकोला जिल्ह्यात महसूल विभागामार्फत राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एड्सग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा आर्थिक मदत दिली जात असून, अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
समाजात बहिष्कृत जीवन जगणार्या एड्सग्रस्तांना आर्थिक मदत करुन, त्यांना दिलासा देण्यासाठी, महसूल विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गत वर्षभरात एड्सग्रस्त रुग्णांचा शोध घेण्यात आला. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालयामार्फत जिल्ह्यातील एड्सग्रस्त रुग्णांच्या याद्या तयार करण्यात आल्या. या यादीनुसार एड्सग्रस्तांची संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार अकोला महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ३९६ एड्सग्रस्त रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा प्रत्येकी ६00 रुपयांप्रमाणे महसूल विभागामार्फत मदतीचे वाटप सुरु करण्यात आले आहे. अशा प्रकारे गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील एड्सग्रस्तांना मदतीचे वाटप सुरु आहे. सामाजिक जाणिवेतून एड्सग्रस्त रुग्णांना दरमहा आर्थिक मदतीव्दारे आधार देण्याचा उपक्रम अकोल्यात राज्यात पहिल्यांदाच राबविला जात आहे. एड्सग्रस्तांना दिली जाणारी दरमहा आर्थिक मदत मोठी नसली तरी, त्यांच्यासाठी ती महत्वाचा आधार ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.