‘दहशतवादाला मिळणारे पाठबळ कमी होणार’
By admin | Published: November 16, 2016 06:00 AM2016-11-16T06:00:24+5:302016-11-16T06:00:24+5:30
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तान स्पॉन्सर दहशतवाद आणि फेक करन्सीला आळा बसून दहशतवादाला मिळणारे पाठबळ निश्चितच कमी होईल
मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तान स्पॉन्सर दहशतवाद आणि फेक करन्सीला आळा बसून दहशतवादाला मिळणारे पाठबळ निश्चितच कमी होईल, असे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ’लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. या दहशतवादाबरोबरच काळा बाजार आणि गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयाचा दहशतवाद आणि गुन्हेगारीवर परिणाम सांगताना माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी बनावट नोटा सहजपणे छापत होते. शिवाय हाच पैसा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, अमली पदार्थाच्या तस्करींवर गुंतवणूक करत होते. या निर्णयामुळे त्यावर अंकुश बसण्यास मदत होणार आहे. देशाबाहेर अतिरेकी कारवाया सुरू असताना देशाअंतर्गत वर्चस्व वाढविण्यासाठी माओवाद, नक्षलवाद्यांनी लूट अथवा विविध मार्गाने मिळविलेला पैसा लपवून ठेवला आहे. ठिकठिकाणी दडवून ठेवलेले हजारो कोटी रुपयांच्या नोटांचा फायदा त्यांना होणार नाही. अशात त्यांना लागणारे शस्त्र,अन्न आणि औषधसाठा यासाठी लागणाऱ्या पैशांवर कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे गुन्हे करण्यासाठी लागणारे त्यांचे प्राबल्य कमी होईल. (प्रतिनिधी)