सुप्रीम कोर्टाने रचला इतिहास!
By admin | Published: July 31, 2015 04:19 AM2015-07-31T04:19:38+5:302015-07-31T04:19:38+5:30
याकूब मेमनला आणि त्याच्या वतीने इतरांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मागण्याची संधी देऊन न्यायसंस्थेने भारताचे नाव जगात उंचावले. हे करीत असताना सर्वोच्च न्यायालयाने
नवी दिल्ली : याकूब मेमनला आणि त्याच्या वतीने इतरांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मागण्याची संधी देऊन न्यायसंस्थेने भारताचे नाव जगात उंचावले. हे करीत असताना सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या वतीने करण्यात आलेल्या शेवटच्या याचिकेवर गुरुवारी पहाटे खुली सुनावणी घेऊन इतिहास रचला. सर्व न्यायालयीन प्रक्रिया संपल्याने फाशी आता अटळ आहे, असे म्हणत न्यायालयाने ही शेवटची याचिका गुरुवारी पहाटे ४.५० वाजता फेटाळली आणि त्यानंतर १०५ मिनिटांनी सकाळी ६.३५ ला याकूबला फासावर लटकविण्यात आले.
‘डेथ वॉरंट’विरुद्ध याकूबने केलेली रिट याचिका न्या. दीपक मिश्रा, न्या. प्रफुल्ल चंद्र पंत आणि न्या. अतिताव रॉय यांच्या खंडपीठाने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फेटाळली तेव्हा एक शेवटची आशा म्हणून सर्वांचे डोळे राष्ट्रपती भवनाकडे लागले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज रात्री १०.४५ वाजता फेटाळला तेव्हा आता सर्व मार्ग खुंटले, असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तसे व्हायचे नव्हते व याकूबच्या फाशीची अनिश्चितता त्यानंतरही सात तास आणखी ताणली जायची होती.
केवळ याकूबलाच नव्हे तर मानवतावादी विचारातून कोणालाही फाशी होऊ नये असे वाटणारे प्रशांत भूषण व आनंद ग्रोव्हर हे ज्येष्ठ वकील सरन्यायाधीश न्या. एच.एल. दत्तू यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते. तेथे त्यांनी याकूबच्या फाशीविरुद्ध आम्ही याचिका घेऊन आलो आहोत, असे कळविले व त्यावर लगेच सुनावणी व्हावी, अशी त्यांनी विनंती केली. सरन्यायाधीशांना झोपेतून उठवून हा निरोप दिला गेला. त्यांनी लगेच सुनावणी घेण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ज्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे आधीच्या याचिकेची सुनावणी झाली होती त्याच खंडपीठाने या नव्या याचिकेवरही सुनावणी करावी, असे ठरले. यानुसार न्या. मिश्रा, न्या. पंत व न्या. रॉय यांना निरोप पाठविले गेले. न्या. वर्मा तिघांमध्ये ज्येष्ठ न्यायाधीश असल्याने त्यांच्या निवासस्थानी सुनावणी होईल या अपेक्षेने वकीलमंडळी मध्यरात्रीनंतर १ वाजता त्यांच्या घरी पोहोचली. न्या. पंत व न्या. रॉय हेही तेथे आले व तिघांनी विचार-विनिमय करून सुनावणी घरी न घेता सर्वोच्च न्यायालयात खुल्या पद्धतीने घेण्याचे ठरविले. अॅटर्नी जनरल रोहतगी यांना निरोप धाडला.
न्यायाधीशांची सुरक्षा वाढविली याकूबची फाशी टाळण्यासाठी अगदी शेवटच्या दिवशी केल्या गेलेल्या याचिका ज्या तीन न्यायाधीशांनी फेटाळल्या त्यांच्या जिवाला धोका संभवू शकतो, अशी गुप्तवार्ता गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
कडेकोट कडीकुलुपात बंद असलेली सर्वोच्च न्यायालयाची इमारत उघडली गेली. सुनावणीसाठी क्र. ४ चे न्यायदालन सज्ज केले गेले. तिघेही न्यायाधीश उत्तररात्री २.३० च्या सुमारास न्यायालयात पोहोचले. रोहतगी यांच्या येण्याची प्रतीक्षा केली गेली आणि ते आल्यावर पहाटे ३.२० वाजता नीरव शांततेत ही ऐतिहासिक सुनावणी सुरू झाली. पुढील दीड तास झालेल्या युक्तिवादांमध्ये प्रशांत भूषण, आनंद ग्रोव्हर, युग चौधरी आणि वृंदा ग्रोव्हर या वकिलांनी याकूबची फाशी टाळावी, अशी कळकळीची विनंती केली.
याकूबला मनाची तयारी करण्यासाठी, अल्लाची इबादत करण्यासाठी आणि ऐहिक सांसारिक बाबींची उस्तवार करण्यासाठी निदान १४ दिवसांचा तरी वेळ द्यावा, एवढाच त्यांचा किमान आग्रह होता. परंतु सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल रोहतगी यांनी सकाळपासूनचा ठाम विरोधाचा सूर कायम ठेवला. पुन्हा पुन्हा याचिका करून सर्वोच्च न्यायालयात येणे हा न्यायप्रक्रियेचा निव्वळ दुरुपयोग आहे. याकूबने केलेली याआधीची याचिका सायंकाळी ४.३० वाजता फेटाळली तेव्हाच त्याच्या फाशीच्या संदर्भातील सर्व न्यायिक प्रक्रिया संपली आहे. तरीही १४ दिवसांच्या अवधीसाठी आता पुन्हा याचिका केली गेली आहे. याला काही अंतच राहणार नाही. तरी न्यायालयाने यात अजिबात हस्तक्षेप करू नये, असे रोहतगी यांनी निक्षून सांगितले.