सुप्रीम कोर्टाचे सर्वाधिक न्यायाधीश मूळचे मुंबईचे
By Admin | Published: November 14, 2016 05:48 AM2016-11-14T05:48:22+5:302016-11-14T05:48:22+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे,
अजित गोगटे / मुंबई
सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे, तसेच देशाच्या आत्तापर्यंत झालेल्या एकूण ४३ सरन्यायाधीशांपैकी सर्वाधिक सरन्यायाधीशही मुंबईनेच दिले आहेत.
भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाल्यानंतर, दोन दिवसांनी दिल्लीतील टिळक मार्गावरील सध्याच्या वास्तूत सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरू झाले. थेट वकिलांमधीन नेमल्या गेलेल्या काही न्यायाधीशांचा अपवाद वगळता, गेल्या ६६ वर्षांत सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीश देशभरातील २३ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना बढत्या देऊन नेमले गेले आहेत. सरन्यायाधीश न्यायाधीशांमधील सेवाज्येष्ठतेनुसार नेमले जातात. सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकांमध्ये विविध राज्ये, महिला अथवा मागासवर्गीय यांच्यासाठी कोणताही ‘कोटा’ नसला तरी शक्यतो प्रत्येक उच्च न्यायालयातून एक तरी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयावर यावा, असा प्रयत्न केला जातो.
सर्वोच्च न्यायालयावर गेल्या ६६ वर्षांत झालेल्या न्यायाधीशांच्या नेमणुकांचे विविध निकषांवर विश्लेषण करणारा मुरली कृष्णन यांचा एक माहितीपूर्ण लेख ‘बार अॅण्ड बेंच’ या कायदेविषयक नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. हे विश्लेषण करताना संबंधित न्यायाधीशाची सर्वप्रथम ज्या उच्च न्यायालयावर नेमणूक झाली ते त्याचे मूळ न्यायालय (पॅरेन्ट हायकोर्ट) असे मानून हे विश्लेषण करण्यात आले आहे. १९९३ मध्ये न्यायाधीश निवडीची ‘कॉलेजियम’ची पद्धत लागू झाल्यानंतरच्या नेमणुका व त्याआधीच्या नेमणुका अशा दृष्टीनेही त्यात विश्लेषण केले गेले आहे.