‘हमीदवाडा’ची याचिका ‘सुप्रीम’ने फेटाळली
By admin | Published: January 8, 2015 12:51 AM2015-01-08T00:51:42+5:302015-01-08T00:53:42+5:30
हसन मुश्रीफ यांची माहिती : संताजी घोरपडे साखर कारखान्याचे गाळप रोखण्यास नकार
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबाबत हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली, अशी माहिती संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक, आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
घोरपडे काखान्यामुळे परिसरात प्रदूषण होते, कारखान्याचे गाळप रोखावे, अशी मागणी हमीदवाडा कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत घोरपडे कारखाना सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर कारखान्याचे गाळप सुरू झाले, पण हमीदवाडा कारखाना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी व संताजी घोरपडे कारखाना बंद करावा, अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर आज, दि. ७ सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मुखोपाध्याय व न्या. रमण्णा यांच्या खंडपीठाने हमीदवाडा साखर कारखान्याची याचिका फेटाळली. उच्च न्यायालयाने केलेला एक लाख रुपये दंड कमी करावा, अशी विनंती हमीदवाडा कारखान्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यावर संताजी घोरपडे कारखान्याचे अॅड. हरेण रावळ यांनी हमीदवाडा कारखान्यांचा दंड कमी करण्यास सहमती दिली. घोरपडे कारखान्याच्यावतीने अॅड. हरेण रावळ, अॅड. जैन, अॅड. शिवाजीराव जाधव यांनी काम पाहिले तर हमीदवाडा कारखान्याच्या वतीने अॅड. सिब्बल, अॅड. त्रिवेदी, अॅड. सटाले यांनी काम पाहिल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.