हक्कभंगप्रकरणी शोभा डेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
By admin | Published: April 28, 2015 11:53 AM2015-04-28T11:53:23+5:302015-04-28T11:55:10+5:30
मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त ट्विट करणा-या शोभा डे यांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त ट्विट करणा-या शोभा डे यांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग नोटीशीला स्थगिती दिली आहे.
मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी प्राईमटाईममध्ये एक शो सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवासंपूर्वी घेतला होता. या निर्णयाविरोधात शोभा डे यांनी ट्विटरवर वादग्रस्त ट्विट केले होते. फडणवीस सरकार हुकुमशहा असल्याचे शोभा डे यांनी म्हटले होते. यावरुन शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारत शोभा डे यांना हक्कभंगाची नोटीसही बजावली होती.
मंगळवारी शोभा डे यांनी या नोटीशीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने हक्कभंगाच्या नोटीशीला स्थगिती दिली असून यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून उत्तर मागवले आहे. उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.