१२ निलंबित आमदारांच्या याचिकेवर लवकरच निर्णय; सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद संपले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:25 AM2022-01-20T06:25:01+5:302022-01-20T06:25:24+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या या याचिकेवर काही दिवसांतच निर्णय येण्याची शक्यता
नवी दिल्ली : विधानसभेत असभ्य वर्तणुकीसाठी महाराष्ट्र विधानसभेने निलंबित केलेल्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील सर्व युक्तिवाद बुधवारी सर्वोच्च न्यायालयात संपले असून यावरील निर्णय राखून ठेवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या या याचिकेवर काही दिवसांतच निर्णय येण्याची शक्यता आहे.
गेल्या जुलै महिन्यात विधानसभेत असभ्य व असंसदीय वर्तणूक केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले आहे. या निर्णयाला आमदार आशिष शेलार व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
या याचिकेवरील सर्व युक्तिवाद संपले असून यावर लेखी युक्तिवाद येत्या ८ दिवसांत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने याचिकेच्या वादी व प्रतिवादींना दिले आहेत.