दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पाठविली मुंबई हायकोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 12:04 PM2017-08-01T12:04:53+5:302017-08-01T12:07:08+5:30
दहीहंडीच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली.
नवी दिल्ली, दि. 1- दहीहंडीच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुंबई हायकोर्टाकडे पाठवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. तसंच 7 ऑगस्टला याचिकेवर सुनावणी करण्याचे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे. वीस फूट उंचीसह गोविंदाचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावं, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता.सण व संस्कृती जपण्याच्या सबबीखाली आयोजकांनी सरकारला हे नियम शिथिल करण्यासाठी साकडं घातलं आहे. मात्र सध्यातरी सरकारच्या हाती काहीच नसल्याने सरकारनेही नियमांत बदल करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली.
गोविंदांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करणार; याबाबत राज्य शासनाला लेखी अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करायचा होता. पण आता सुप्रीम कोर्टाने दहीहंडीबाबतची याचिका पुन्हा मुंबई हायकोर्टाकडे पाठविल्याने आता गोविंदा पथकांना हायकोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.
गोविंदा पथकांवरील निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत आयोजकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कित्येक आयोजकांनी दहीहंडीसाठी लावलेल्या बक्षीस रकमेतही कपात केली आहे.
गुरुपौर्णिमेपासून गोविंदांनी मनोरे उभे करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्वच गोविंदांना असे वाटत आहे की, निर्बंध उठविले जातील. तसे झाल्यास गोविंदांचा उत्साह वाढेल. गोविंदांच्या सुरक्षेबाबत शासन लेखी भूमिका मांडेल. आपणही त्यास सहकार्य करणे गरजेचे आहे. समितीच्या पुढील उपक्रमांची दिशा न्यायालयाच्या निर्णयानंतर ठरविण्यात येईल, असे दहीहंडी समन्वय समितीकडून सांगण्यात आलं होतं.
सध्या शहरात गोविंदा आणि दहीहंडी पथके दहीहंडीचा सराव करण्यात व्यस्त आहेत. गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या सरावाची तयारी सुरू झाली आहे. पण यंदा दहीहंडीला नोटाबंदीचा फटकासुद्धा बसण्याची शक्यता आहे, असे मतही गोविंदा पथकांकडून व्यक्त केले जात आहे. तर सरावाच्या वेळी जितके थर लावता तितकेच थर दहीहंडीच्या दिवशी लावा. त्याहून अधिक थर लावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन गोविंदा आणि गोविंदा पथकांना करण्यात येत आहे.