सलमानच्या सुटकेविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात
By Admin | Published: December 23, 2015 03:11 PM2015-12-23T15:11:54+5:302015-12-23T15:40:33+5:30
हिट अँण्ड रन खटल्यात बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या झालेल्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - हिट अँण्ड रन खटल्यात बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या झालेल्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली.
सलमानच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारकडून मंगळवारी मंजुरी मिळाली अशी माहिती सरकारी वकिल ए.बी.वागयानी यांनी न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश गौतम पटेल यांच्या खंडपीठाला दिली.
१० डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सलमान खानची हिट अँण्ड रन खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणी मे महिन्यात सत्र न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला सलमानने मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान दिले होते. तिथे सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. सलमानवर २८ सप्टेंबर २००२ च्या रात्री वांद्रे येथे पदपथावर झोपलेल्या पाच जणांना आपल्या गाडीखाली चिरडण्याचा आरोप होता. यात एकाचा मृत्यू झाला होता तर, चार जण जखमी झाले होते.