सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांकडून पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2016 05:29 AM2016-11-01T05:29:26+5:302016-11-01T05:29:26+5:30

सर्वोच्च न्यायालयाने ‘अर्नेशकुमार वि. बिहार शासन’ प्रकरणात दिलेल्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांनी पायमल्ली केली आहे.

Supreme court verdict sealed by police in Sitabuldi | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांकडून पायमल्ली

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांकडून पायमल्ली

Next


नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ‘अर्नेशकुमार वि. बिहार शासन’ प्रकरणात दिलेल्या निर्णयाची सीताबर्डी पोलिसांनी पायमल्ली केली आहे. यामुळे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाचे न्यायाधीश जे. आर. गाडगे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवार व तपास अधिकारी के. आर. गवई (पोलीस उपनिरीक्षक) यांना फटकारून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकरणातील माहितीनुसार, २८ आॅक्टोबर रोजी झांशी राणी चौक येथे सीताबर्डी पोलिसांनी आरोपी हरिश्वर मेंढरे यांच्यावर हेल्मेट घातले नसल्यामुळे कारवाई केली. दरम्यान, मेंढरे व पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. हा गोंधळ पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी गोळा झाली होती. यानंतर मेंढरे यांना पोलीस ठाण्यात नेऊन भादंविच्या कलम ३५३, ३३२ व २९४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता मेंढरे यांना तत्काळ अटकही केली. परिणामी सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाची पायमल्ली झाली. सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेचा गुन्हा असल्यास विशिष्ट कारण नोंदविल्याशिवाय कोणालाही अटक करता येत नाही असे संबंधित निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मेंढरे यांनी केलेल्या गुन्ह्यात केवळ तीन वर्षे कारावासापर्यंतची शिक्षा आहे. असे असताना मेंढरे यांना २८ तारखेचा पूर्ण दिवस व रात्र आणि २९ तारखेचा पूर्ण दिवस कारागृहात घालवावा लागला. जेएमएफसी न्यायालयाने त्यांना मुक्त करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. अभियांत्रिकी पदवीधारक असलेले मेंढरे व्यवसायाने बिल्डर आहेत. मेंढरे यांच्यातर्फे अ‍ॅड. आकाश गुप्ता यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Supreme court verdict sealed by police in Sitabuldi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.