सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 02:32 PM2020-09-11T14:32:42+5:302020-09-11T14:36:57+5:30
हजारो विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून मुकावे लागणार
पुणे: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिल्याचा पहिला फटका इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.परिणामी यंदा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी ) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून मुकावे लागणार आहे.
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशातर्फे राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाकडून प्राप्त होणा-या आदेशानंतर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द केले जाणार असल्याचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.मात्र,या निर्णयामुळे यंदा अकरावी प्रवेशासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज भरणा-या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी प्रवेश समितीतर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयातील एक लाखाहून अधिक जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशाच्या दुस-या नियमित फेरीची गुणवत्ता यादी १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार होती.परंतु,न्यायालयाच्या निर्णयामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेची पूर्ण कार्यवाही थांबविण्यात आली.
मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रकियेतून एसईबीसी प्रवर्गाचा कटआॅफ खुल्या प्रवर्गाच्या कटआॅफ पेक्षा कमी होता.त्यामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.यंदा राबविण्यात आलेल्या पहिल्या प्रवेश फेरीतही तसेच चित्र दिसून येत आहे.त्यामुळे एसईबीसीतून प्रवेशाची संधी मिळाली नाही तर अनेक विद्यार्थ्यांचा तोटा होणार असल्याचे उपलब्ध आकडेवारी वरून दिसून येत आहे.
मागील वर्षी बीएमसीसीमध्ये वाणिज्य शाखेत खुल्या संवर्गाचा कटआॅफ ४७४ होता तर एसईबीसीचा कटआॅफ साठी ४३८ होता.
-------------------------------------
खुल्या व एसईबीसी संवर्गाचा कटआॅफ (वर्ष २०१९-२० )विज्ञान शाखा
महाविद्यालयाचे नाव खुला संवर्ग एसईबीसी संवर्ग
आपटे प्रशाला ४७८ ४५३
मॉडर्न कॉलेज ४५३ ४०८
आबासाहेब गरवारे ४४८ ३८०
फगर््युसन कॉलेज ४८० ४४६
नौरोसजी वाडिया ४२६ २५३
अशोक विद्यालय ४५५ २८७
स.प.महाविद्यालय ४५६ ३८७
सिंबायोसिस ४२३ २९०