शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणाला भाजपाकडून पद, सुप्रिया सुळे संतप्त, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 07:26 PM2023-08-04T19:26:10+5:302023-08-04T19:26:49+5:30
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी अटकेची कारवाई झालेल्या आणि ५० दिवस तुरुंगात राहिलेल्या नाशिकमधील निखिल भामरे या तरुणाकडे आता भाजपाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी अटकेची कारवाई झालेल्या आणि ५० दिवस तुरुंगात राहिलेल्या नाशिकमधील निखिल भामरे या तरुणाकडे आता भाजपाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपाकडून त्याची सोशल मीडिया सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाकडून झालेल्या या नियुक्तीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आदरणीय पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला भाजपाने सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे. देवेंद्रजी - तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, संसदेत काल केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहा सिद्धांताबद्दल बोलले, आपण सिद्धा़तांचे पालन करताय का? एका गुन्हेगारी मानसिकतेच्या व्यक्तीला राजाश्रय दिला जातो, ही अतिशय खेदाची आणि गंभीर बाब आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
नाशिकमधील निखिल भामरे या तरुणाने सोशल मीडियावर शरद पवार यांच्याबाबत त्यांचं नाव न घेता एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्याच्याविरोधी राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुढे सुमारे ५० दिवस निखिल भामरे हा तुरुंगात होता.