'सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री डील झालेली'; यामुळेच शिवसेना फुटली?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:05 PM2023-06-19T14:05:06+5:302023-06-19T14:05:59+5:30
शिवसेना फोडण्यामागे भाजपाचा हात आहे, हे आता सर्वश्रूत आहे. परंतू, वेगवेगळी त्याची वेगवेगळी कारणे दिली जात आहेत.
शिवसेनेचा आज वर्धापन दिन साजरा होणार आहे. यंदा पहिल्यांदाच दोन वेळा वर्धापन दिन होत आहे. शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवून टाकले होते. तसेच कायदेशीर लढाईत शिवसेना पक्ष, चिन्ह आपल्याकडे ठेवले होते. यामुळे राज्याचे पुढील राजकारण उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यावरच फिरत राहणार आहे. असे असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक वेगळाच दावा केला आहे.
शिवसेना फोडण्यामागे भाजपाचा हात आहे, हे आता सर्वश्रूत आहे. परंतू, वेगवेगळी त्याची वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. ४० आमदार का बाजुला झाले, याची ही कारणे आहेत. त्यात आता आणखी एका दाव्याची भर पडली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ चा एक फॉर्म्युला तयार केला होता. त्यात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील असे ठरविण्यात आले होते. जेव्हा याची कुणकुण शिवसेनेच्या आमदारांना लागली तेव्हा त्यापैकी ४० आमदारांनी बंड पुकारले व मविआचे सरकार कोसळले असा दावा बावनकुळेंनी केला आहे.
मविआमध्ये उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहतील अशी ही डील होती. २०२४ च्या निवडणुकीनंतर सुप्रिया यांना मुख्यमंत्री केले जाणार होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांची संख्या देखील कमी होणार होती, असा दावा त्यांनी केला आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात बावनकुळेंनी हा दावा केला आहे.
राष्ट्रवादीचे १०० आमदार निवडून येतील असे टार्गेट पवारांनी ठेवले होते. उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते, तर अजित पवार काम करत असायचे. पवारांच्या याच टार्गेटमुळे शिवसेनेच्या आमदारांना पराभवाची चिंता सतावू लागली होती, याचे रुपांतर बंडात झाल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे सरकार असताना मला शिवसेनेचे आमदार किमान ५० वेळा तरी भेटले असतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कायम राहिले तर आम्ही ६५ चे १० झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणायचे. पुढच्या वेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील, असा करार झाला आहे. आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार असा करार होता. याच करारातून उद्धव यांनी आमदारांना गमावण्याचा निर्णय घेतल्याचे हे आमदार आपल्याला सांगायचे, असा दावा बावनकुळे यांनी केला.