'त्याच अर्ध्या तासात मुंडे आणि कराड एकमेकांना व्हिडीओ कॉल करत होते'; सुळेंचा स्फोटक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:45 IST2025-03-04T17:42:46+5:302025-03-04T17:45:06+5:30
Santosh Deshmukh Case Chargesheet: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे.

'त्याच अर्ध्या तासात मुंडे आणि कराड एकमेकांना व्हिडीओ कॉल करत होते'; सुळेंचा स्फोटक दावा
Santosh Deshmukh Case Update: "संतोष देशमुख यांना ज्यावेळी मारहाण सुरू होती, त्यावेळी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकमेकांना व्हिडीओ कॉल करत होते. देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मीक कराडने त्याच्या दुसऱ्या मोबाईलवरून धनंजय मुंडेंना कॉल केला होता", या सुप्रिया सुळे यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंडेंचाही या प्रकरणात थेट सहभाग असल्याचे सुळेंनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"जर हे फोटो बघितले असतील, तर..."
सुप्रिया सुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बोलताना म्हणाल्या की, "हे भयानक आहे. आज ८४ दिवस झाले आहेत. मला काही मुद्दे माध्यमांसमोर ठेवायचे आहेत. आता हे जे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यातील फोटो बाहेर आले. आरोपपत्र तर सरकारने आधी पाहिलंच असेल ना? म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हे फोटो पाहिलेच असतील ना? तु्म्ही आम्ही बघण्याआधी त्यांनी हे पाहिलेच असतील. जर हे फोटो बघितले असतील, तर या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला ८४ दिवस लागले?", असा उद्विग्न सवाल सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला केला.
कृष्णा आंधळे गायब होतोच कसा?
"ही जी माहिती समोर येते आहे. सुरेश धस आणि अंजली दमानियांची विधानं पाहिली. संदीप क्षीरसागर तर वारंवार म्हणत आहेत की, कृष्णा आंधळेचा सीडीआर द्या आणि कृष्णा आंधळे असा गायब होतोच कसा? सातवा खूनी गायब आहे आणि हे सगळे कटात सहभागी आहेत", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कराडने स्वतःच्या दुसऱ्या मोबाईलवरून मुंडेंना कॉल केला
"सुरेश धस, अंजली दमानियांनी सीडीआर दाखवले आहेत. ज्याची माहिती आलेली आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मीक कराड... जेव्हा ही क्रूर हत्या चालली होती, तेव्हा यांनी वाल्मीक कराडला कॉल, व्हिडीओ कॉल केलेले आहेत. वाल्मीक कराड यांनी तो कॉल ठेवला आणि स्वतःच्या दुसऱ्या मोबाईलवरून त्यांनी धनंजय मुंडेंना कॉल केलेला आहे. हा मी आरोप करत नाहीये, तर ही खरी वस्तुस्थिती आहे. जी सुरेश धस, अंजली दमानिया आणि सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे", असे सांगत सुप्रिया सुळे या प्रकरणाशी धनंजय मुंडेंचाही संबंध असल्याचे सूचक विधान केले.
त्या पुढे म्हणाल्या की, "विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे, हे त्याच अर्ध्या तासात एकमेकांना व्हिडीओ आणि कॉल करत होते. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? आणि दोन-तीन दिवस नाही, ८४ दिवस ही सगळी माहिती सरकारला होती की नाही? आणि आता हे मंत्री म्हणतात की, मी आजारी आहे म्हणून राजीनामा दिला. हीच ती नैतिकता?", असा संतप्त सवाल सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंना केला आहे.