हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 08:41 AM2020-02-10T08:41:15+5:302020-02-10T09:05:16+5:30
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईः हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. पीडितेनं गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली असून, मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर राजकीय नेत्यांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.
ही अतिशय दुर्दैवी घटना आज सकाळी झालेली आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी घटना आहे. हा मृत्यू नसून खून झालेला आहे, असं मला आता वाटते. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा गृहमंत्र्यांनी केलेला उल्लेख कृतीत येण्याची अत्यंत तातडीची गरज आहे, अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या. कुठलीही व्यक्ती असल्यास त्याच्याविरोधात अशी घटना घडल्यास त्याला तातडीनं न्याय मिळेल, असा मेसेज राज्यात गेला पाहिजे. कायद्याचा धाक बसणं अतिशय गरजेचं आहे. तिच्या आईवडिलांच्या भावनांचा विचारही करू शकत नाही. ते कोणत्या भयानक परिस्थितीतून जात असतील. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला आहे. आधार म्हणून त्यांच्यासोबत उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला.
अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) February 10, 2020
गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र तिची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. 7 फेब्रुवारीला तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. सकाळी तिनं अखेरचा श्वास घेतला.