Supriya Sule: "माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस", खासदार सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:18 AM2022-04-21T11:18:22+5:302022-04-21T11:18:40+5:30
Supriya Sule: "माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, कदाचित त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल."
सोलापूर:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी नाव न घेता राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. तसेच, ईडी आणि इनकम टॅक्सच्या रेडबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. "माझ्या भावाच्या घरी कधीच ईडीची रेड झाली नाही, पण, माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय," असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी गुडी पाढव्याच्या सभेत बोलताना, 'अजित पवारांच्या घरावर इडीची रेड होते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर होत नाही', असा आरोप केला होता.
''माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस''- खासदार सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट#supriyaSule#incometaxpic.twitter.com/5fr655WEZ8
— Lokmat (@lokmat) April 21, 2022
सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
त्या वक्तव्याबाबत बोलताना खासदार सुळे यांनी मोठा खुलासा केला. "माझ्या भावाच्या(अजित पवार) घरी कधीच रेड झालेली नाही. कदाचित त्या लोकांना(राज ठाकरे) कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल. त्यांचा बेसच चुकीचा आहे, त्यामुळे कंपॅरिझनचा प्रश्नच येत नाही. उलट मी केंद्र सरकारच्या विरोधात भाषण देते, त्यामुळे माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय," असा मोठा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
भोंगा महत्वाचा की महागाई?
दरम्यान, अलीकडेच अहमदनगर येथे सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता शाब्दिक हल्ला केला होता. आपण दोन वर्षांनंतर कोरोना महामारीतून बाहेर पडत आहोत. अशा परिस्थितीत हे समाजात द्वेष पसरवत आहेत. स्वत: काहीही कामे करीत नाहीत, केवळ भाषणे करतात. लोकांना देव, धर्मावरून भडकावतात. आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो; पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पाहा. त्यावर काहीही हावभाव नसतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. तसेच, भोंगा महत्त्वाचा की महागाई असा प्रश्न प्रत्येकाने घरात विचारला तर ‘महागाई’ असेच उत्तर येईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.