"शरद पवारांनी जातीचं विष कालवलं"; राज ठाकरेंवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इतना तो हक..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 03:40 PM2024-08-24T15:40:08+5:302024-08-24T15:43:34+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

Supriya Sule responded to Raj Thackeray criticism of Sharad Pawar | "शरद पवारांनी जातीचं विष कालवलं"; राज ठाकरेंवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इतना तो हक..."

"शरद पवारांनी जातीचं विष कालवलं"; राज ठाकरेंवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इतना तो हक..."

Supriya Sule On Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.  राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं. शरद पवारांवर निशाणा साधत त्यांच्यावर राज ठाकरेंनी जातीयवादाचे आरोप केले. त्यानंतर आता  राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांच्यावर आरोप केल्यावरच हेडलाईन होते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना टोला लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे अँटी मोदी आणि अँटी शाह होते. मतदारांनी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या प्रेमासाठी मतदान केले नाही. संविधान बदलण्याच्या कारणामुळे दलितांनी आणि अन्य काही मतदारांनी एकगठ्ठा मतदान केले. पण मागील पाच वर्षात गलिच्छ राजकारण झाले आहे. ज्यामुळे लोक या राजकारण्यांना स्वीकारणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

जातीचे विषही शरद पवार यांनीच कालवले - राज ठाकरे

"पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद अधिक वाढला आहे. पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचे राजकारण झाले आहे. या सर्व गोष्टींना शरद पवार कारणीभूत आहेत. त्यांनी ही सुरुवात केली. पुलोद स्थापन झाल्यापासून ही गोष्ट सुरू आहे. शरद पवार यांनी १९९१ ला शिवसेनेचे आमदार फोडले. भुजबळ वगैरे फोडले. त्यानंतर अनेक लोकांना फोडले. गणेश नाईकांना फोडले. राणे गेले. हे सर्व राजकारण शरद पवार यांनी सुरू केले. जातीचे विषही शरद पवार यांनीच कालवले," असंही राज ठाकरे म्हणाले. 

सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांवर भाष्य केलं. "गेली २५ वर्षे तेच ऐकतेय मी. लोकशाही असल्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे. ते बोलल्यावर हेडलाईन झाली. शरद पवार यांच्याविषयी बोलल्यावर, टीका केल्यावर हेडलाईन होते. त्यामुळे इतना तो हक बनता ही है उसका," असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं.
 

Web Title: Supriya Sule responded to Raj Thackeray criticism of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.