"तू पैसे परत घेऊनच दाखव मग तुझा..."; सुप्रिया सुळेंनी रवी राणांना भरला दम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 05:32 PM2024-08-13T17:32:41+5:302024-08-13T17:39:16+5:30

Ladki Bahin Yojana : आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले होते.

Supriya Sule warning to Ravi Rana on Ladaki Baheen Yojana | "तू पैसे परत घेऊनच दाखव मग तुझा..."; सुप्रिया सुळेंनी रवी राणांना भरला दम

"तू पैसे परत घेऊनच दाखव मग तुझा..."; सुप्रिया सुळेंनी रवी राणांना भरला दम

Supriya Sule Warn Ravi Rana : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. निवडणुकीसाठी ही योजना सुरु केल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. तर सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मविआच्या नेत्यांकडून केलं जात आहे. अशातच महायुतीचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याने सरकारची चांगलीच अडचण निर्माण झाली. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन थेट इशारा दिला आहे.

महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना राज्य सरकार प्रति महिना १५०० रुपयांचा हप्ता देणार आहे. या योजनेचे दोन हप्ते १७ ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. अशातच बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरुन केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणची रक्कम ३ हजार करु  मात्र, ज्या महिला निवडणुकीत आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यातून १५०० परत घेणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत रवी राणा यांना समज दिली. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट रवी राणा यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

शरद पवार गटाच्या एका कार्यक्रमात सत्तेतील भाऊ काय म्हणतात बघा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप दाखवली. "तुम्ही विचार करा माहेर जेव्हा सोडून सासरी जातो, तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, असं म्हणणारा भाऊ असतो. तोच भाऊ बहिणीला जर धमकी देणार असेल तर बघा मत नाही दिलं ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे.  मग आम्ही बहिणी परवडल्या. काय नको भावांनी प्रेम दिलं यावरच आम्ही खूश असतो. नको बाबा तुझे  १५०० रुपये. राज्यातील बहि‍णींची ताकद १५०० रुपये परत घेणाऱ्या भावाला समजेल. या महाराष्ट्रातील लेक, तिला अशा धमक्या दिल्या तर चालणार नाहीत. तू पैसे परत घेऊनच दाखव मग बघते तुझा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा ते," असा दम सुप्रिया सुळे यांनी दिला.

रवी राणांचे स्पष्टीकरण

"आपण गमतीने हे वक्तव्य केलं. बहीण भावाचे नाते आपुलकीचे असलं पाहिजे. मी जे गमतीने बोललो त्याचा विरोधक बाऊ करत आहे. लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही वाईट वाटेल असं वक्तव्य केलं नव्हतं. भाऊ हा बहिणीचं कुठेही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. काँग्रेसने खोटं बोलून मतदान घेतलं, पण हे सरकार तसं करणार नाही. शिंदे सरकारकडून महिलांच्या खात्यावर पहिल्यांदा पैसे टाकण्यात येणार आहे," असं स्पष्टीकरण रवी राणा यांनी दिलं.

Web Title: Supriya Sule warning to Ravi Rana on Ladaki Baheen Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.