आव्हाडांची सुरक्षेतील कुचराई हा ढिसाळ कारभार की, सनातनी अतिरेक्यांच्या सोयीसाठी केलेले कारस्थान? सुप्रिया सुळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 09:03 PM2018-09-01T21:03:53+5:302018-09-01T21:04:55+5:30
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील कुचराईवरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. आव्हाड यांची सुरक्षा व्यवस्था काही महिन्यांपूर्वी कमी करण्यात आली होती. मात्र आता आव्हाड यांची संपूर्ण माहिती अतिरेक्यांना असल्याचे तसेच त्यांचे घर आणि कार्यालयाची रेकी या अतिरेक्यांनी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आव्हाड यांची सुरक्षा व्यवस्था कमी करणे हा सरकारचा ढिसाळ कारभार म्हणायचा की सनातनी अतिरेक्यांच्या सोयीसाठी केलेले कारस्थान म्हणायचे ?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकार आ. जितेंद्र आव्हाड यांची सहा महिन्यांपूर्वी सुरक्षा कमी करते आणि आज केंद्रीय सुरक्षा यंत्रणा 'आ.आव्हाड सनातनी अतिरेक्यांच्या "हिटलिस्ट"वर अग्रभागी असल्याचे जाहीर करते' हा गलथान कारभार की सनातनी अतिरेक्यांच्या सोयीसाठी केलेले कारस्थान ?
— Supriya Sule (@supriya_sule) September 1, 2018
हिंदू धर्माविरुद्ध बोलणारे आणि अजितदादा, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्त दाभोलकर, रितू राज 'हिटलिस्ट'वर होते असल्याचा गौप्यस्फोट एटीएसने शुक्रवारी न्यायालयात केला होता. एटीएसने गेल्या आठवड्यात शनिवारी घाटकोपर येथील भटवाडीतून अविनाश पवार या तरूणाला बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) अटक केली होती. या अविनाश पवारची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केस डायरीचे वाचन केले. त्यात त्यावेळी हिंदू धर्माविरुद्ध बोलणारे आणि अजितदादा, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्त दाभोलकर, रितू राज 'हिटलिस्ट'वर होते असल्याचे केस डायरीतून नावं उघड झाली. त्याचप्रमाणे पवारने काही ठिकाणांची रेकी केली असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. तसेच पवारने राज्याबाहेरून शस्त्र प्रशिक्षण घेतले होते.
जितेंद्र आव्हाड यांची पूर्ण माहिती अतिरेक्यांना होती. त्त्यांच्या घराची ऑफिसची रेकी करण्यात आली होती राज्याची गुप्तचर यंत्रणा काय करत होती आणि मग सुरक्षा व्यवस्था कमी करताना चुकीची माहिती दिली ही जबाबदारी कुणाची?
— Supriya Sule (@supriya_sule) September 1, 2018