"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:43 PM2024-11-14T17:43:45+5:302024-11-14T17:45:10+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एका परदेशी व्यक्तीचा संदर्भात देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इव्हीएम मशिन संदर्भात भाष्य केले आहे...
राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता, एका परदेशी व्यक्तीचा संदर्भात देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इव्हीएम मशिनसंदर्भात भाष्य केले आहे. "एका परदेशी व्यक्तीने फोन करून मशिनमध्ये गडबड असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की काही मशिनमध्ये गडबड होऊ शकते. पण मला निवडणूक आयोगावर विश्वास आहे," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या एका प्रचार सभेत बोलत होत्या.
"ताई, मशिनमध्ये गडबड..." -
'त्या' एका परदेशी व्यक्तीचा संदर्भ देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "एका माणसाचा फोन येतो मला. तो कुणीतरी परदेशी आहे. तो सारखं फोन करून म्हणतो की, 'ताई, मशिनमध्ये गडबड आहे, मशिनमध्ये गडबड आहे.' मी त्याला म्हणते, 'मी मशिनमुळेच निवडून आले. मी कसं म्हणणार मशिनमध्ये गडबड आहे?'"
आता खरं खोटं मला माहिती नाही, पण... -
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "आता खरं खोटं मला माहिती नाही, पण अशी एक कथा चालली आहे की, काही मशिन्समध्ये गडबड करतील. असं तो माणूस म्हणतोय. मी म्हणत नाही. हे 170 सीट येतात, असे म्हणत आहेत, कारण त्यांनी काहीतरी नियोजन केलेले आहे." यानंतर, "माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही, कारण माझा आजही इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे," असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.