कोरोना लसीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली मोठी मागणी
By बाळकृष्ण परब | Published: January 19, 2021 07:02 PM2021-01-19T19:02:09+5:302021-01-19T19:08:47+5:30
corona vaccination Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. तसेच या पत्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे.
मुंबई - राज्यात कोरोनाविरोधातील लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईमधून कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानाला औपचारिक सुरुवात झाली होती. दरम्यान, राज्यातील कोरोनाकाळातील परिस्थिती कुशलपणे हाताळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. तसेच या पत्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सुप्रिया सुळे म्हणतात की, कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशाच्या आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. अशा परिस्थितीत तुमच्या नेतृत्वाखाली राज्याच्या आरोग्य यंत्रणेने अतिशय उल्लेखनीय काम करून देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यासाठी तुमचे, मंत्रिमंडळाचे अभिनंदन.
दरम्यान, या पत्रामधून सुप्रिया सुळे यांनी कोरोना लसीकरणामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता कोरोनावरील लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की, लशीकरणाला सुरुवात करताना ती गरजू घटकांपर्यंत पोहोचावी, यासाठी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आता कोरोनावरील लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे @CMOMaharashtra आपणास नम्र विनंती आहे की,लशीकरणाला सुरुवात करताना ती गरजू घटकांपर्यंत पोहोचावी,यासाठी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.@OfficeofUT@AjitPawarSpeaks
— Supriya Sule (@supriya_sule) January 19, 2021