"आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय", नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 03:38 PM2023-10-27T15:38:45+5:302023-10-27T15:42:37+5:30
महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! त्यांचे स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.२७) शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि कालव्याचे लोकार्पण केले. यावेळी कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल करत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. या टीकेवर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! त्यांचे स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आज सुप्रिया सुळे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील टीकेचा सवाल माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार अर्थातच पवार साहेबांवर…त्यांच स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी आलं तरी पवार साहेबांवर टीका केल्या शिवाय बातमी होत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, याच मोदी साहेबांच्या सरकारने पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याचीही आठवणही सुप्रिया सुळे यांनी करून दिली. तसेच, अगोदर पंतप्रधान राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे; ते यावेळी म्हणाले नाहीत. त्यामुळे यावेळी त्यांचे आरोप बदलले, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी मराठा आरक्षणावर बोलताना महायुती सरकारवर टीका केली. "मला वाटतं हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे. सरकारला ४० दिवसांची डेडलाईन दिली होती. मला वाटलं यांच्याकडे काहीतरी जादूची कांडी असेल. काहीतरी प्लान असेल. मग या ट्रिपल इंजिनच्या सरकारने ४० दिवसांचा मॅजिक नंबर आणला कुठून?, मग परत जरांगेंना आंदोलनाला बसावं लागलं म्हणजे आणखी एक ही जुमलेबाजी आहे", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत... कुठलाही समाज असू द्या, या सगळ्यांची आरक्षणाची मागणी आहे. सरकारने सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीला बोलवावं. त्यानंतर पाच-दहा दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. त्यात चर्चा होऊ द्या अशी माझी मागणी आहे, असेही सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकतीने सरकारसोबत असेल, मग ते कुणाचेही सरकार असो, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.