सूर ज्योत्स्ना पुरस्काराची ओळख जगात व्हावी

By admin | Published: March 24, 2016 01:55 AM2016-03-24T01:55:43+5:302016-03-24T01:55:43+5:30

मागील तीन वर्षांपासून लोकमत परिवाराकडून दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

The Sur Jyotsna Award should be known in the world | सूर ज्योत्स्ना पुरस्काराची ओळख जगात व्हावी

सूर ज्योत्स्ना पुरस्काराची ओळख जगात व्हावी

Next

नागपूर : मागील तीन वर्षांपासून लोकमत परिवाराकडून दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पुरस्कारासाठी श्रेष्ठ संगीतकारांकडून देशातील प्रतिभावंत कलावंतांचा शोध घेतला जातो, ही प्रशंसनीय बाब आहे. ज्योत्स्नाभाभी या शक्ती व भक्तीच्या अनुष्ठानाचे प्रतीक आहेत. सखी मंचच्या माध्यमातून त्यांनी महिला शक्तीचे संघटन उभे केले. ज्योत्स्ना दर्डा यांच्यात असलेल्या समाजसेवेच्या वृत्तीमुळेच आज ही पुरस्कारांची परंपरा सुरू झाली आहे. प्रेरणादायी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराची ओळख संपूर्ण जगात निर्माण व्हावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त दरवर्षी ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार ’ देशातील नवोदित प्रतिभावंत कलावंतांना प्रदान करण्यात येतो. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष होते. हजारो संगीत रसिकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार यंदा गायिका अंकिता जोशी आणि बासरीवादक आकाश सतीश यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि प्रत्येकी एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल, इन्डोअर स्टेडियम, मानकापूर येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला समृद्धी को आॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी, अमृता फडणवीस, सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, लोकमतच्या ऐडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा आशु दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला मालार्पण करून झाला. लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा आशू दर्डा यांनी प्रास्ताविकातून ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी खा. विजय दर्डा म्हणाले, विधानसभेचे सत्र सुरू असतानाही मुख्यमंत्री आपल्या प्रेमापोटी येथे आले. आमचे सारे कुटुंबीयही येथे उपस्थित आहे. कठीण काळात या साऱ्यांनीच मला साथ केली. दिग्गज कलावंत या अवॉर्डचे परीक्षक आहेत.
त्यामुळे अल्पावधीतच हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा झाला, याचे समाधान आहे. रूपकुमार राठोड यांनीही हा पुरस्कार केवळ राष्ट्रीय नव्हे तर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा होईल, असा विश्वास व्यक्त केला. ज्योत्स्ना दर्डा यांनी लावलेल्या बीजाचा आता सखी मंचच्या स्वरूपात वटवृक्ष झाला आहे. तीन लाखांच्या वर सदस्य असणारा हा पहिलाच मंच असावा. त्यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार अनेक कलावंतांना प्रोत्साहन आणि बळ देणारा आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पुरस्कारप्राप्त अंकिता जोशी आणि आकाश सतीश यांनी सादरीकरण करून त्यांच्या प्रतिभेचा परिचय दिला. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांनी मानले. ध्वनिसंयोजन संदीप बारस्कर यांचे होते. या कार्यक्रमाला खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकरराव देशमुख, आ. अनिल सोले, आ. आशिष देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. समीर मेघे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खा. दत्ता मेघे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे भारत तांगडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त संजय लाटकर आणि दर्डा कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमाला दर्डा कुटुंबीयांचे मित्र आणि शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, व्यावसायिक, उद्योग, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
या पुरस्काराने प्रोत्साहन मिळाले : अंकिता जोशी
संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा यंदाचा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ आम्हाला मिळाला. याचे प्रचंड मोठे समाधान आहे. या पुरस्काराने मला प्रोत्साहन मिळाले. संगीत अधिक समर्पित होऊन शिकण्याचे बळ मिळाले आहे. यानंतर भविष्यात एक चांगली गायिका होण्यासाठी खूप परिश्रम घेणार असल्याचा संकल्प यावेळी अंकिता जोशीने केला. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल तिने लोकमत परिवाराचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी अंकिताने राग किरवाणीतील एका बंदिश सादर करून अभंग सादर करीत उपस्थितांची दाद घेतली. भविष्यात शास्त्रीय संगीतच सादर करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. ती पं. जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत आहे.
या पुरस्काराने जिद्द मिळाली : आकाश सतीश
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मी बासरी वाजवितो. मोठा भाऊ शशांकमुळे मी बासरीकडे वळलो. त्यानंतर वेनटेकल गोरखेंडी, जयदीप मेवुंडी, रोणु मुजुमदार यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकत आहे. अजून बासरीवादनाचा मोठा पल्ला मला गाठायचा आहे पण या पुरस्काराने हा पल्ला गाठण्याची जिद्द मला मिळाली. माझ्यासाठी हा पुरस्कार माझे आयुष्य बदलविणारा आहे. इतका मानाचा पुरस्कार मला मिळाल्याचा आनंद मला शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही. भविष्यात शास्त्रीय संगीतासह सुगम संगीताचेही वादन करायला मला आवडेल, असे आकाशने सांगितले. याप्रसंगी त्याने राग दुर्गा बासरीवर सादर करून रसिकांची पसंती मिळविली.
> के.के.च्या गीतांवर
थिरकले नागपूरकर
नागपूर : पार्श्वगायक के.के. म्हणजे तरुणांच्या गळ्यातला ताईत. के.के. येणार म्हणून त्याच्या चाहत्यांनी इन्डोअर स्टेडियम फुल्ल झाले होते. के. के. रंगमंचावर एन्ट्री घेण्यापूर्वीच गीताला प्रारंभ करीत धावतच रंगमंचावर आला आणि एकच जल्लोश झाला. टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे रसिकांनी स्वागत केले. त्यानंतर मात्र एकापेक्षा एक गीतांचा काफिला रसिकांच्या मनावर गारुड करणारा होता. प्रचंड उत्साह आणि मनापासून गायन करीत त्याने नागपूरकरांना जिंकले. त्याला प्रतिसाद देत हा कार्यक्रम रंगतदार झाला.
विशेषत: के.के.ने सातत्याने प्रत्येक गीतानंतर रसिकांशी संवाद साधत त्यांना आपलेसे केले. मस्तीभरी, खोल आशयाची, संथ आणि गतिमान अशी साऱ्याच प्रकारची गीते त्याने सादर केली. त्याने आपल्या गायनाचा प्रारंभ ‘क्यू आजकल निंद कम ख्वॉब ज्यादा है...’ या त्याच्याच लोकप्रिय गीताने केला. यानंतर मात्र त्याने गीतांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना बांधून ठेवले. याप्रसंगी त्याने ‘दिल ये बादल कर रहा है..., तुझे सोचता हुं मै शामो..., ऐ बेखबर मेरा दिल तेरे प्यार मे आह भरे..., अभी अभी तुम मिले है..अभी ना करो रुठने की बात..., ओ हमदम सुनियो रे..., आवारापन बंजारापन..., मै हु डॉन.., है जुनुं..., आशाएं...., हम रहे या ना रहे कल..., खुदा जाने क्यु ए खुदा..., जरासी दिलमे दे जगह तू...’ आदी गीतांनी समा बांधला. याप्रसंगी कुठल्याही तालाशिवाय केवळ पियानोच्या धुनवर त्याने ‘तडप तडप के इस दिल से....’ हे लोकप्रिय गीत सादर करून ही मैफिल अधिक उंचीवर नेली. कार्यक्रमाच्या अखेरीस मात्र तरुणाईचा मूड मस्तीचा झाला आणि गतिमान गीतांच्या सादरीकरणाची मागणी झाली. प्रेक्षकांची मागणी मान्य करीत के.के.ने त्यानंतर धूम केली. यावेळी सारे स्टेडियम त्याच्या गीतांवर थिरकत होते. एकूणच त्याचे सादरीकरण, रसिकांची एक सायंकाळ आणि हा पुरस्कार सोहळा अविस्मरणीय करणारा ठरला.

Web Title: The Sur Jyotsna Award should be known in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.