सांगलीतून कुस्ती क्षेत्राला हादरवणारी बातमी; कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकमने आयुष्य संपविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 20:52 IST2024-06-28T20:51:39+5:302024-06-28T20:52:27+5:30
Suraj Nikam death News: नागेवाडीत राहत्या घरी घेतला गळफास : कुस्ती क्षेत्रात खळबळ

सांगलीतून कुस्ती क्षेत्राला हादरवणारी बातमी; कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकमने आयुष्य संपविले
- दिलीप मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : अत्यंत कमी वयात आणि अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला नागनाथनगर - नागेवाडी (ता. खानापूर) गावचा सुप्रसिद्ध कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल पै. सुरज जनार्दन निकम (वय ३०) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
नागेवाडी ( नागनाथनगर) येथील सुपुत्र पै. सुरज निकम याने अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी करुन आपला दबदबा निर्माण केला होता. कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना आस्मान दाखवले होते. त्याने अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात नावलौकिक निर्माण केला होता. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती.
पै. सुरज निकम हा वडिलांच्या निधनानंतर व्यतीत होता. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागेवाडी येथील जुन्या राहत्या घरातील एका खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याचे मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी पै. सुरज याला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकम याचा विवाह दीड महिन्यापूर्वी झाला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
विटा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पैलवान सुरजचा भाऊ आसाम येथे व्यवसायनिमित्त असल्याने ते आल्यानंतर शनिवारी दुपारी पै. सुरज निकम याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली आहे.