सूरजचा मित्र दडला कुठे?
By admin | Published: September 21, 2014 01:12 AM2014-09-21T01:12:14+5:302014-09-21T01:12:14+5:30
कारागृहातून पळाल्यानंतर लगेच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा कैदी सूरज श्याम अरखेल याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल आणि चार सीमकार्ड जप्त केले. त्याला पळून जाण्यास मदत
आकाशसाठी जागोजागी चौकशी : तीन मोबाईल अन् चार सीम जप्त
नागपूर : कारागृहातून पळाल्यानंतर लगेच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा कैदी सूरज श्याम अरखेल याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल आणि चार सीमकार्ड जप्त केले. त्याला पळून जाण्यास मदत करणारा आकाश मात्र कुठे गडप झाला, ते कळायला मार्ग नाही. आकाशचा छडा लावण्यासाठी सदर पोलीस जंग जंग पछाडत आहेत.
सूरजने कारागृहातून पळून जाण्याचा प्लॅन अगदी एखाद्या सिनेमातील खलनायकासारखाच बनवला. त्याचमुळे कारागृहाचे प्रवेशद्वार ओलांडताच त्याच्यासमोर आकाश आपला आॅटो घेऊन उभा होता. हा आॅटो सदरमध्ये शाळेजवळ पोहचला तेव्हा त्याची अल्पवयीन प्रेयसीही वाट पहात होती. सदरमधून निघाल्यानंतर ते मूर्तिजापूरला पोहचले.केवळ अमरावतीत त्यांनी एकदाच नाश्त्यासाठी थांबा घेतला. मूर्तिजापूरच्या नाक्यावर रोशन मारवे (आत्याचा मुलगा) वाट बघत होता. (कारागृहातून सूरज पळून आला किवा त्याने सोबत आणलेली मुलगी अल्पवयीन आहे, याची त्याला माहिती नव्हती, असे म्हणतात!) घरी पोहचल्यानंतर या तिघांची रोशनने सरबराई केली. आॅटोचालक आकाश मात्र तेथून भल्या सकाळीच सटकला.
सदर पोलिसांनी सूरज अन् त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले. सूरजच्या ताब्यातून दोन मोबाईल आणि तीन सीमकार्ड तसेच ‘तिच्या‘ ताब्यातून एक मोबाईल आणि एक सीमकार्ड पोलिसांनी जप्त केले. त्यांना पळून जाण्यासाठी मदत करणारा आॅटोचालक आकाश अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. आकाश वापरत असलेले मोबाईलचे सीमकार्ड भलत्याच्याच नावावर आहे. त्यामुळे त्याला शोधण्यात अडचण येत असल्याचे समजते. सदरचे पोलीस निरीक्षक जी. के. राठोड, द्वितीय निरीक्षक राजेंद्र मछिंदर आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
कारागृह हादरले, अधिकारी गप्प!
खुनाच्या आरोपातील एक कैदी दिवसाढवळ्या कारागृहातून पळून गेल्यामुळे आणि त्याच्याकडून कारागृहातील धक्कादायक प्रकारांची माहिती उघड होण्याची दाट शक्यता असल्यामुळे कारागृह प्रशासन हादरले आहे. गृहमंत्रालयानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. कारागृहातील वरिष्ठ अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहे. वारंवार संपर्क करूनही कुणीच काही बोलायला तयार नाही.