सूर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यांपर्यंत!
By Admin | Published: November 10, 2016 05:31 AM2016-11-10T05:31:34+5:302016-11-10T05:31:34+5:30
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारपासून किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या गुडघ्यांना स्पर्श केला.
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारपासून किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या गुडघ्यांना स्पर्श केला. त्यामुळे आज, गुरुवारी होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी किरणे कंबरेच्या वरपर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे.
भारतीय प्रगत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून अंबाबाई देवीच्या मंदिराकडे पाहिले जाते. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या हेमांडपंथी मंदिरात वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा होता. यामध्ये दक्षिणायन व उत्तरायण असे दोन किरणोत्सव होतात. त्यापैकी दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला.
सूर्यकिरणांची तीव्रता चांगली होती. त्यामुळे किरणांनी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी अंबामातेच्या गुडघ्यांपर्यंत स्पर्श केला. या किरणोत्सवात डाव्या बाजूच्या दोन इमारतींवरील जिन्याच्या टोप्या या किरणांमध्ये अडथळा ठरल्या. त्यामुळे बुधवारी पहिल्याच दिवशी किरणांना देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचण्यात अडथळा आला. याशिवाय हिवाळ्यातील दव, धुलीकणांचाही यात अडथळा ठरला. हा सोहळा सुमारे ४९ मिनिटांचा ठरला. (प्रतिनिधी)
किरणांची तीव्रता चांगली असूनही ती टिकली नाहीत. कारण यामध्ये महाद्वार दरवाजाकडील डाव्या बाजूच्या मिणचेकर, आगळगावकर यांच्या इमारतींवरील जिने, टेरेसवरील टोपी यांचा अडथळा आला. हे अडथळे महापालिकेकडून दूर झाले, तर किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल.
- उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ, कोल्हापूर
किरणांची तीव्रता चांगली होती; परंतु ती कमी झाली. इमारतींचे अडथळे दूर झाले तर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होईल. त्यात दव, धुलीकणांचाही समावेश आहे. अडथळा नसता तर पहिल्याच दिवशी किरणे देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचली असती.
-प्रा. किशोर हिरासकर, किरणोत्सव अभ्यासक, कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी किरणे देवीच्या गुडघ्यांपर्यंत पोहोचली.