‘सुरेल’ पहाट!
By admin | Published: February 20, 2016 01:42 AM2016-02-20T01:42:26+5:302016-02-20T01:42:26+5:30
मासुंदा तलावाभोवती हजारो नाट्यरसिकांची तुडुंब गर्दी, तलावाभोवती दिव्यांचा लखलखाट, तरंगत्या रंगमंचावर आकाश कंदिलांची सजावट आणि दुसरीकडे राहुल देशपांडे व आनंद भाटे यांच्या सुरेल आवाजातून सादर केलेली
मासुंदा तलावाभोवती हजारो नाट्यरसिकांची तुडुंब गर्दी, तलावाभोवती दिव्यांचा लखलखाट, तरंगत्या रंगमंचावर आकाश कंदिलांची सजावट आणि दुसरीकडे राहुल देशपांडे व आनंद भाटे यांच्या सुरेल आवाजातून सादर केलेली नाट्यगीते आदींनी नाट्यसंमेलनाची पहिली पहाट प्रेक्षकांच्या हृदयात घर करून गेली.
बंदिशी, नाट्यपद, भजन या सादरीकरणाने प्रेक्षक आनंदून गेले. मासुंदा तलावात तरंगत्या रंगमंचावर नाट्यसंगीत ऐकण्याचा एक आगळावेगळा अनुभव नाट्यरसिकांनी अनुभवला.
देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘सुमन साहेब सुलतान’ या बंदिशीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर, ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यपद सादर केले. ‘एरी माहिया आज शुभमंगल गावो’ ही बंदिश भाटे यांनी सादर केल्यावर ‘सोहमपर डमरू बाजे’ हे नाट्यपद सादर केले. ‘जयशंकरा गंगाधरा’ हे गीत देशपांडे यांनी तर भाटे यांनी ‘रात्रीचा समय सरुनि’ सादर केले. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला १०० दिवस पूर्ण झाल्याचे सांगत देशपांडे यांनी स्वत: गायलेले ‘दिल की तपीश आज आफताब’ हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर, भाटे यांनी ‘खरा तो प्रेमाला धरी लोभ मनी’ हे गीत सादर केले. देशपांडे व भाटे यांच्या भजनांची मेडली रंगली व या मेडलीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
‘राजसा सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘हरि विठ्ठल नामाचा गजर’, ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’, ‘चिन्मया सकल हृदया’ या भजनांनी कार्यक्रमाची सांगता केली. तबल्यावरील साथ प्रसाद पाध्ये यांनी, तर हार्मोनिअमवरील साथ आदित्य ओक यांची होती. त्यानंतर, संमेलनाचे आयोजक खा. राजन विचारे यांनी सहभागी कलाकारांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला. निवेदन अश्विनी कानोलकर यांनी केले. ठाण्यात सुरू असलेल्या ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या मुख्य कार्यक्रमांस शुक्रवारपासून सुरुवात झाली. संमेलनपूर्व कार्यक्रमात पहाटे मासुंदा तलाव येथील तरंगत्या रंगमंचावर नाट्यसंगीताचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांची गर्दी आणि नाट्यसंमेलनाचा माहोल पाहून गायक राहूल देशपांडे यांनी दिवाळी पहाट पुन्हा अवतरल्याचा प्रत्यय येत असल्याचे सांगत नाट्यरसिकांच्या उपस्थितीचे कौतुक केले.