नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:50 AM2024-05-22T09:50:42+5:302024-05-22T09:51:04+5:30
Pune Porsche Accident Update: एवढा गंभीर गुन्हा करूनही आरोपी बाहेर आला, अल्पवयीन असला तरी त्याला सोडविण्यासाठी काय काय घडले याची चर्चा रंगली आहे.
पुण्यातील बिल्डर बाळाने मध्यरात्री दारुच्या नशेत दोन बळी घेतले. नोंदणी नसलेली पोर्शे कार बेदरकारपणे चालवून, दोघांना आयुष्यातून उठवून देखील या अब्जाधीश बिल्डर बाळाला १५ तासांतच शुल्लक अटींवर जामीन मिळाल्याने पुण्यातच नाही तर राज्यभरातून या रेड कार्पेटवर टीका होऊ लागली आहे. यामुळे राज्य सरकारही सावध झाले असून या हायप्रोफाईल केसमध्ये जामीन कसा मिळाला याचे एकेक किस्से समोर येऊ लागले आहेत.
एवढा गंभीर गुन्हा करूनही आरोपी बाहेर आला, अल्पवयीन असला तरी त्याला सोडविण्यासाठी काय काय घडले याची चर्चा रंगली आहे. पुणे पोलिसांनी या आरोपीची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट पाच तासांनी केली. यामुळे ती निगेटिव्ह आली. यामुळे बाहेर माध्यमांना पोलीस आयुक्त जरी तो दारुच्या नशेत होता असे सांगत असले तरी कोर्टात सांगू शकत नव्हते. याचाच फायदा या आरोपीला जामीन मिळण्यास झाला. यावरून पुणे पोलिसांवर पुणेकर नागरिकांचा रोष वाढू लागला आहे. हे प्रकरण शेकतेय असे दिसताच पोलिसांनी आरोपीची रक्त चाचणी केली ती पॉझिटीव्ह आली आहे.
आता बाल न्यायालयात काय झाले ते देखील समोर येऊ लागले आहे. आजवर फक्त त्या आरोपीला न्यायाधीशांनी निबंध लिही, पंधरा दिवस वाहतुकीचे नियमन कर अशा अटी घातल्या आहेत, हेच सांगितले जात होते. परंतु या सुनावणीवेळी या आरोपीच्या आजोबाने आपला प्रतापी नातू अभ्यासात लक्ष देईल, वाईट संगतीपासून दूर राहिल अशी हमी दिल्याने जामीन मिळाल्याचे समोर आले आहे.
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली यांनी या मुलाच्या वाईट वागण्यामुळे, त्रास दिल्याने आपल्या मुलाला त्रास झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या मुलाकडे जर वेळीच लक्ष दिले असते तर आज दोघांचा जीव वाचला असता असेही त्या म्हणाल्या आहेत. या लाडावलेल्या बिल्डर बाळाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल आता लक्ष द्यायचे म्हणत आहेत. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
काय घातल्या अटी....
अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल कोर्टात आले होते. त्यांनी लाडक्या नातवाला वाईट संगतीपासून लांब ठेवण्याची हमी कोर्टाला दिली. तसेच अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल असेही ते कोर्टाला म्हणाले. याचबरोबर कोर्टाने अल्पवयीन आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील असे म्हटले आहे. पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, पळून जाणार नाही, अशी हमी त्याच्या वकिलांनी दिली आहे. भविष्यात अपघात झाल्यास किंवा दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल, निबंध लिहावा लागेल व पंधरा दिवस वाहतुकीचे नियोजन करावे लागेल अशा अटी या आरोपी बाळाला घालण्यात आल्या आहेत.