सुरेश धस यांचे राष्ट्रवादीतून ६ वर्षासाठी निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 04:33 PM2017-04-07T16:33:31+5:302017-04-07T16:34:20+5:30
राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश धस यांना पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी सहा वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 - राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश धस यांना पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी सहा वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनिल तटकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे शुक्रवारी दिली.
सुरेश धस यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या सूचना व आदेशाचे पालन न करता पक्षधोरणाविरोधी भूमिका घेतली होती. तसेच, विरोधी पक्षांना मदत केल्याच्या त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी पक्षाकडे आलेल्या होत्या.
बीड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी निवडणुकीतही त्यांच्याकडून विरोधी पक्षाला मदत करण्यात आली होती. या कारणांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.