Santosh Deshmukh: ...त्यामुळे मी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही; सुरेश धसांनी अखेर कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 23:56 IST2025-01-01T23:55:10+5:302025-01-01T23:56:23+5:30

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस हे सातत्याने वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करत आहेत. धनंजय मुंडेंवरही धस बोलत आहेत, पण ते नाव घेत नाहीयेत.

Suresh Dhas explained the reason for not mentioning Dhananjay Munde's name in Santosh Deshmukh murder Case | Santosh Deshmukh: ...त्यामुळे मी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही; सुरेश धसांनी अखेर कारण सांगितलं

Santosh Deshmukh: ...त्यामुळे मी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही; सुरेश धसांनी अखेर कारण सांगितलं

Suresh Dhas Dhananjay Munde News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस हे सातत्याने वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. पण, धनंजय मुंडेंच्या नावाचा उल्लेख त्यांच्याकडून केला जात नाही. वाल्मीक कराड यांचा आका म्हणून उल्लेख करताहेत तर धनंजय मुंडे यांचा आकाचे आका असे म्हणत गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी आतापर्यंत केले आहेत. यामागचं कारण सुरेश धस यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले. 

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांना तुम्ही सत्ताधारी पक्षातील आहात आणि एका मंत्र्यावर थेट आरोप होतोय म्हणून तुम्हाला सांगण्यात आलंय का की, धनंजय मुंडेंचं नाव घेऊ नका?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

धनंजय मुंडेंबद्दल आमदार धस यांचे मत काय?

या प्रश्नाला उत्तर देताना भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, "विरोधी पक्ष आहेत, तेही बोलत आहेत. सत्ताधारी असलो तरी इतक्या बेकारपणे मारलेल्या माणसाबद्दल मी गप्प बसणार नाही. आज त्यांचं नाव (धनंजय मुंडे) कुठेही नाहीये. मी सुद्धा सांगतोय की, धनंजय मुंडेंचा या प्रकरणात हात असेल, असं मी आज तरी मानत नाही."

याच प्रश्नावर बोलताना आमदार धस पुढे म्हणाले की, "मी ठामपणे, ९९.९९ टक्के हे सांगतो की, ही वाल्मीकची चूक आहे. म्हणजे वाल्मीक अण्णाला ती सवय आहे की, कोणाचेही फोन उचलायचे आणि कोणत्याही वेळी कोणालाही फोन करायचे. तशी ती चांगली गोष्ट आहे राजकारण्यासाठी."

धनंजय मुंडे यांचे नाव न घेण्याचे कारण काय?

"हे प्रकरण होताना त्यांनी (संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी) शंभर टक्के आकाला (वाल्मीक कराड) फोन केला असेल आणि आकाने तो फोन घेतला असेल. आणि आका सुद्धा म्हणला असेल मारा, झोडा, काहीतरी... असे बोलला असेल, तर आका शंभर टक्के त्यात येतो. पण, आकाचे आका थेट असे काही बोलले असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे मी त्यांचं नाव घेत नाही", असे भूमिका आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केली.  

Web Title: Suresh Dhas explained the reason for not mentioning Dhananjay Munde's name in Santosh Deshmukh murder Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.