संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:32 AM2018-06-13T05:32:47+5:302018-06-13T05:32:47+5:30

विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

 Suresh Dhas won without any strength | संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

Next

- सतीश जोशी
बीड - विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सुरेश धस यांच्या विजयाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा राजकीय मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. तर पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली आहे.
न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटलेल्या या निवडणुकीची सुटका तब्बल अठरा दिवसानंतर म्हणजे १२ जून रोजी झाली. उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील मतदारांचा समावेश असलेली ही निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच चर्चेत होती. भाजपाचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडे यांनी भाजपाला धक्का दिला, तर राष्टÑवादीतून निलंबित झालेले सुरेश धस यांना अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वीच भाजपाने उमेदवारी देऊन जशास तशी परतफेड केली. याच रमेश कराडानी शेवटच्या क्षणी माघार घेत राष्टÑवादीला गोत्यात आणले. रिंगणात उमेदवारच नसल्यामुळे राष्टÑवादीने अशोक जगदाळे यांना पाठिंबा देऊन नामुष्की टाळण्याचा केविलवाणी प्रयत्न केला.
निवडणूक रिंगणात सुरेश धस आणि अशोक जगदाळे हे आमनेसामने असलेतरी प्रत्यक्षात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भावा-बहिणीत प्रतिष्ठेची लढत होती. दोघांनीही ही निवडणूक आपल्या राजकीय अस्तित्वासाठी प्रतिष्ठेची बनवली होती. कागदावरील संख्याबळात विरोधकांचे पारडे अधिक जड असताना देखील केवळ डावपेचाच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी सर्वांचेच सहकार्य घेऊन अशक्यप्राय वाटणारा विजय सुकर करून सुरेश धसांना विजयश्री मिळवून दिली.
संख्याबळात आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे दोनशे मतांनी अधिक असतानाही ७४ मतांनी पराभूत झाले याचा अर्थच भाजपाने विरोधकाची जवळपास तिनशे मते सुरुंग लावून आपल्याकडे वळविली होती. दुसरीकडे जगदाळे यांच्या पराभवास बीड जिल्ह्यातील राष्टÑवादी अंतर्गतची गटबाजी देखील तेवढीच जबाबदार आहे.

क्षीरसागरांची नाराजी भोवली
माजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ. परंतु, गटबाजीमुळे तेही दीड वर्षापासून पक्षापासून चार हात दूरच आहेत. या निवडणुकीत बीड पालिकेतील २७ आणि जिल्ह्यातील १८ असे जवळपास ४५ मतांचे गाठोडे त्यांच्या ताब्यात होते. इकडून तिकडून मते वळविण्याची या बंधूंची ताकद होती परंतु, ते अलिप्त राहिले. त्यांना या निवडणूक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला नाही. या अंतर्गत गटबाजीचा नेमका फायदा भाजपाने उचलला.

अशी झाली मतांची फाटाफूट
निवडणुकीपूर्वी सुरेश धस यांच्याकडे ३८५ इतकीच मते असताना, त्यांनी ५२६ मते मिळवली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्याकडे (राष्ट्रवादी ३३६ अधिक काँग्रेसचे १९१) ५२७ मतांचे बळ असूनही त्यांना ४५२ मतं मिळाली. याचाच अर्थ धस यांनी विरोधकांची १४१ मते आपल्या पारड्यात वळविली.

Web Title:  Suresh Dhas won without any strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.