सुरेश जैन विरोधातील बदनामीचा खटला अण्णा हजारेंकडून मागे
By Admin | Published: May 5, 2016 07:04 PM2016-05-05T19:04:05+5:302016-05-05T19:04:05+5:30
सुरेशदादा जैन यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असलेला बदनामीचा खटला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज मागे घेतला
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 5- माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असलेला बदनामीचा खटला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज मागे घेतला. यासंबंधी अण्णांनी केलेला विनंती अर्ज आज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला.
अण्णांनी सुरेश जैन यांच्यासंबंधी भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केल्यानंतर 9 व 10 मे 2003 रोजी सुरेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन अण्णांवर आरोप केले होते. त्यानंतर 24 जून 2003 रोजी अण्णांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. गेले 13 वर्षे या खटल्याचे कामकाज सुरू होते. जैन यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांसंबंधी 6 पत्रकारांची साक्ष झाल्यानंतर प्रथमदर्शनी सुरेश जैन यांनी अण्णांची बदनामी केल्याचे सिद्ध होत असल्याचा निर्णय गेल्या 21 मार्च 2013 रोजी न्यायालयाने दिला होता. त्यामुळे या खटल्याच्या अंतिम व महत्त्वाच्य़ा टप्प्यातील कामकाज आता सुरू होणार होते.
अण्णांनी 2003 मध्ये जळगावमधील जो घरकूल घोटाळा उघडकीस आणला होता त्यात सुकृतदर्शनी सुरेश जैन दोषी आढळले असून गेले चार वर्षे त्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक वेळा जामीनासाठी अर्ज केले. परंतू सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून घरकूल घोटाळ्यासंबंधीचा खटला चालविण्याचे आदेश दिल्याने जैन यांची तुरुंगातून सुटका होणे कठीण झालेले आहे. जैन यांनी जळगाव न्यायालयात अण्णांच्या विरोधात दाखल केलेला बदमानीचा खटला यापूर्वीच स्वतःहून मागे घेतला आहे. शिवाय सुरेश जैन यांचे आता वय झालेले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला चालविणे मानवतेच्या दृष्टीने योग्य वाटत नसल्याने हा खटला काढून घेण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. त्यानुसार आज पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात अण्णांच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर व अॅड. मिलिंद पवार यांनी तसा अर्ज दाखल केला. तो दाखल करून घेताना न्यायालयाने जैन यांच्या वकीलांना हरकतीसंबंधी विचारणा केली. जैन यांच्याकडून ना हरकतीचा अर्ज दाखल झाल्यानंतर व दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी हा खटला मागे घेण्यासंबंधीचे आदेश दिले.
या संदर्सभात अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, "सुरेश दादा जैन यांच्या संबंधी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची विनंती मी सुमारे 13 वर्षापूर्वी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार सरकारतर्फे चौकशी होऊन जैन यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आल्याने ते गेल्या 4 वर्षापासून कारागृहात आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाकडून आरोपीचा जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळण्यात आला असून खटला चालविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत वयोवृद्ध झालेले जैन हे कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय जैन यांनी माझ्या विरोधात जळगाव न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. तो खटला आरोपी जैन यांनी स्वतःहून काढून घेतलेला आहे. त्यामुळे सध्या जैन यांची माझ्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. सध्या माझे वय 78 वर्षे असून वयोमानापरत्वे अधिकचा प्रवास किंवा धावपळ न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. तसेच राळेगणसिद्धी येथे सातत्याने भेटीसाठी येणारे अभ्यागत व इतर कामांमुळे सदर खटल्याच्या कामासाठी वेळ देणे मला अडचणीचे होत आहे.
अशा परिस्थितीत सुमारे 13 वर्षांपूर्वी आरोपी जैन यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहत जैन यांना न्याय व्यवस्थेकडून योग्य ते प्रायश्चित्त मिळत आहे अशी माझी धारणा झालेली आहे. आरोपी जैन यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक भांडण किंवा सूडभावना नाही. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. अशा परिस्थितीत सुरेश जैन यांचे झालेले वय, न्यायालयात त्यांच्या विरोधात सुरू असलेला खटला पाहता मानवतेच्या दृष्टीकोनातून मला त्यांच्या विरोधातील हा बदनामीचा खटला चालविणे योग्य वाटत नाही. माझा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनासाठी सुरू आहे. म्हणून आरोपी जैन यांच्या विरोधातील खटला पुढे चालविण्यात मला स्वारस्य नाही."