सुरेशदादांवरील कारवाई आकसाने
By admin | Published: March 18, 2016 02:24 AM2016-03-18T02:24:19+5:302016-03-18T02:24:19+5:30
जळगावचे नेते सुरेशदादा जैन हे आज चार वर्षे उलटली तरी तुरुंगात आहेत. त्यांना साधा जामीन मिळू शकत नाही. त्यांच्या अटकेची कारवाई आकसापोटी करण्यात आली नव्हती का, असा
मुंबई : जळगावचे नेते सुरेशदादा जैन हे आज चार वर्षे उलटली तरी तुरुंगात आहेत. त्यांना साधा जामीन मिळू शकत नाही. त्यांच्या अटकेची कारवाई आकसापोटी करण्यात आली नव्हती का, असा सवाल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महाजन यांच्या वार्तालापाचा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला होता. छगन भुजबळ यांना सरकारने सूडबुद्धीने अटक केली, असा विरोधकांचा आरोप आहे. याकडे लक्ष वेधले असता मंत्री महाजन म्हणाले, आमच्या जळगावचे मोठे नेते सुरेशदादा जैन हे आज चार वर्षे उलटली तरी तुरुंगात आहेत त्याचे काय? हा त्यांच्यावर अन्याय नाही का, असा सवाल महाजन यांनी केला.
सुरेशदादांवरील अन्यायाविरुद्ध आपण मुख्यमंत्री असताना आम्ही आपल्याकडे आलो होतो, अशी आठवणही महाजन यांनी चव्हाण यांना करून दिली.
भुजबळांना अटक करण्याचे कोणतेही कारण नव्हते. तरीही ही राजकीय अटक झाल्याचे जे मत जयंत पाटील यांनी सभागृहात मांडले त्याच्याशी सहमत असल्याचे चव्हाण या वार्तालाप कार्यक्रमात म्हणाले. त्यावर, महाजन यांनी सुरेशदादांच्या अटकेचा विषय काढला. ते म्हणाले, सुरेशदादांनी तर कुठे साधी सही केली नव्हती, ते कुठच्या संबंधित पदावर नव्हते, तरीही त्यांना अटक झाली.
७० लोकांना पकडले होते, त्यातील ६९ बाहेर आले आहेत. पण सुरेशदादा अजून आतच आहेत. जैन यांच्यावर तुरुंगात असताना बायपास करावी लागली. ते आता ७३ वर्षांचे आहेत. पण तरीही त्यांना जामीन मिळत नाही. तत्कालीन सरकार त्यांच्याविषयी आकसाने वागले, असे महाजन यांनी चव्हाण यांना ऐकवले. (विशेष प्रतिनिधी)