प्रस्थापितांच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग

By Admin | Published: November 19, 2016 03:03 AM2016-11-19T03:03:46+5:302016-11-19T03:03:46+5:30

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर झाली.

Surface ambush for the proposers | प्रस्थापितांच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग

प्रस्थापितांच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग

googlenewsNext

आविष्कार देसाई,

अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. आरक्षणामुळे प्रस्थापितांसह दिग्गजांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना आता नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे, अथवा कुटुंबातील सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून स्वप्नपूर्ती करावी लागेल, असे चित्र दिसत आहे. काढलेल्या आरक्षणामध्ये महिलांसाठी सर्वाधिक ३० जागा आरक्षित ठेवण्यात आल्याने जिल्हा परिषदेवर महिलांचे वर्चस्व राहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी आरक्षण जाहीर केले. समीर मुदगल या लहान मुलाच्या हस्ते आरक्षणाची सोडत काढली. याप्रसंगी विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका निर्मितीच्या बाजूने उच्च न्यायालयात निकाल लागल्याने आधी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले. त्यानुसार आता नव्याने आरक्षणाची सोडत काढली आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी सर्वाधिक ३० जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, तर २९ जागा या सर्वसाधारण गटासाठी आहेत. पनवेल तालुक्यातील पालीदेवद हा मतदार संघ अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला. अनुसूचित जमातीसाठी पनवेल तालुक्यातील वावंजे, माणगाव-निजापूर, कर्जत-नेरळ आणि सावेळे, पनवेल- वडघर यांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आठ मतदार संघ आरक्षित झाले. त्यामध्ये मुरुड तालुक्यातील उसरोली, पोलादपूर- देवळे, अलिबाग- शहापूर, माणगाव- तळाशेत, म्हसळा- पाभरे, महाड- नाते, अलिबाग -चेंढरे, माणगाव- मोर्बा या मतदार संघाचा समावेश आहे.
मतदार संघातील आरक्षणामुळे दिग्गजांना फटका बसला आहे. त्यामुळे काहींच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागल्याचे बोलले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे यांचा कर्जत तालुक्यातील नेरळ मतदार संघ अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्षांना शेजारील नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे. शेकापचे आस्वाद पाटील यांचा अलिबाग तालुक्यातील शहापूर मतदार संघ नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित ठेवला आहे. त्यांनाही आरक्षणाचा चांगलाच फटका बसला आहे. पाटील यांना नवीन मतदार संघ शोधावा लागेल. तसेच शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या थळ मतदार संघात सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडले आहे. तेथे दळवी हे पत्नीला उभे करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वहिनी शुभदा तटकरे यांनाही आरक्षणाचा फटका बसला आहे. रोहे तालुक्यातील आंबेवाडी मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादीपासून फारकत घेतलेले शामकांत भोकरे यांचा श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन मतदार संघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. शिवसेनेचे बाळकृष्ण राऊळ यांचा महाड तालुक्यातील नाते मतदार संघ नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित ठेवल्याने त्यांनाही नव्याने मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे.
>आरक्षण बदलाने इच्छुकांची नाराजी
म्हसळा : तालुक्यातील दोन जागांसाठी आरक्षण बदलल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न भंग झाले आहे. तालुक्यातील वरवठने व पाभरे या गटासाठी पहिले सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यामुळे या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता होती. अनेक दिग्गजांना या आरक्षण सोडतीनंतर धक्का बसला आहे.
आता नव्याने पडलेल्या आरक्षणामध्ये वरवठने गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.म.प्र.) तर पाभरे गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव (ना.म.प्र. महिला) असे पडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य नाजीम हसवारे, समीर बनकर, नंदू शिर्के, जि. प. सदस्या वैशाली सावंत हे जिल्हा परिषदेच्या रिंगणातून आऊट झाले.
राष्ट्रवादीकडून सभापती महादेव पाटील, जिल्हा परिषद सदस्या हिरा बसवत, अंकुश खडस तर शिवसेनेकडून माजी प्रभारी सभापती रवींद्र लाड, अनिल काप यांची उत्सुकता कायम आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी म्हसळा तालुक्याला वाऱ्यावर सोडल्याने राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेला ही निवडणूक कठीण जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

Web Title: Surface ambush for the proposers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.