पाच नक्षल्यांचे आत्मसमर्पण

By admin | Published: November 1, 2016 05:51 AM2016-11-01T05:51:31+5:302016-11-01T05:51:31+5:30

प्लाटून दलम सदस्यांसह १२ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षल्यांनी ३० आॅक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले

Surrender of five naxalites | पाच नक्षल्यांचे आत्मसमर्पण

पाच नक्षल्यांचे आत्मसमर्पण

Next


गडचिरोली : प्लाटून दलम सदस्यांसह १२ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षल्यांनी ३० आॅक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे.
आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये करण ऊर्फ दुलसा पेका नरोटी (२३) रा. गोरगुट्टा ता. एटापल्ली, प्रवीण ऊर्फ विलास देवाजी कोल्हा (२३) रा. नैनगुडा ता. एटापल्ली, शारदा ऊर्फ रिना वत्ते पुंगाटी (२०) रा. गुंडझूर ता. एटापल्ली, दरजू कुल्ले उसेंडी (२३) रा. नैनगुडा ता. एटापल्ली, रैजी नळगू गावडे (३०) रा. बेरईवाडा ता. पाखांजूर जि. कांकेर (छत्तीसगड) यांचा समावेश आहे.
करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे हा २००८ मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. नंतर त्याला प्लाटून क्रमांक १४ मध्ये पाठविण्यात आले. तेव्हापासून तो नोव्हेंबर २०१४ पर्यंत त्याच ठिकाणी कार्यरत होता. याचदरम्यान नक्षल्यांनी घडवून आणलेल्या दोगुर चकमक, कोरपल्ली चकमक, मिरकल फाटा चकमक, रानू धुर्वा याचा खून, गुड्डीगुडम बिटाच्या जाळपोळ प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. प्रवीण ऊर्फ देवाजी कोल्हा हा २०१२ मध्ये कसनसूर दलममध्ये सहभागी झाला. सप्टेंबर २०१६ पर्यंत तो कसनसूर दलम सदस्य पदावर कार्यरत होता. यादरम्यान कुंडूम चकमक, दोबेगुडा चकमक, पैडी-कोटमीदरम्यान डांबरी रस्ता खोदणे, जारावंडी-कसनसूर मार्गावरील जवेली फाट्यावर बॅनर बांधणे यामध्ये प्रवीणचा सहभाग होता. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.
शारदा ऊर्फ रिना वत्ते पुंगाटी ही नोव्हेंबर २०१२ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाली. तिला भामरागड दलममध्ये पाठविण्यात आले. तेव्हापासून ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती. यादरम्यान कुचेर चकमकित तिचा सहभाग होता. तिच्यावर दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दरजू कुल्हे उसेंडी हा कसनसूर दलममचा पार्टटाईम मेंबर म्हणून कार्यरत होता. त्याच्या या कार्यकाळात तो एकाही गुन्ह्यामध्ये त्याने सहभाग घेतला नव्हता. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. रैजी नळगू कातवो हा सन २००२ ते २००७ पर्यंत काकनार दलमचा पार्टटाईम मेंबर म्हणून कार्यरत होता. यादरम्यान वच्छाघाट चकमक, आमगेटा येथील तलाठी कार्यालयाची तोडफोड, गुड्डी नरोटीचा खून, निवडणूक प्रचार, वाहन जाळपोळ, ख्रिश्चन ब्रदर्स, स्कूल कुडली येथे काळा ध्वज फडकाविणे या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. 

Web Title: Surrender of five naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.