जहाल नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण
By admin | Published: October 11, 2015 03:36 AM2015-10-11T03:36:18+5:302015-10-11T03:36:18+5:30
भामरागड पोलिसांसमोर अलीकडेच नक्षल दाम्पत्याने आत्मसमर्पण केले. प्लाटून कमांडर व दलम उपकमांडर असलेल्या या दोघांवरही पोलीस विभागाने १८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती
गडचिरोली : भामरागड पोलिसांसमोर अलीकडेच नक्षल दाम्पत्याने आत्मसमर्पण केले. प्लाटून कमांडर व दलम उपकमांडर असलेल्या या दोघांवरही पोलीस विभागाने १८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
प्लाटून क्रमांक १८चा कमांडर सुक्कू ऊर्फ महारू राजू मुड्यामी (३२) व त्याची पत्नी भामरागड-गट्टा दलमची उपकमांडर गिरीजा ऊर्फ झुरी पुस्सु मट्टामी (२९) अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. सुक्कू मड्यामी हा २००१मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन २००६पर्यंत सदस्य होता. २००९ साली तो प्लाटून क्रमांक १८चा कमांडर बनला. त्याचबरोबर गिरीजा मट्टामी ही २००२मध्ये भामरागड दलम सदस्य म्हणून भरती झाली. २००५मध्ये येथून तिची बदली होऊन २००७पर्यंत क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनच्या अध्यक्षपदी तिची नेमणूक करण्यात आली. २००९मध्ये तिची पुन्हा भामरागड-गट्टा दलममध्ये बदली करून उपकमांडर म्हणून नेमण्यात आले. नक्षल चळवळीला कंटाळून या जोडप्याने २०१३मध्येच आत्मसमर्पण करण्याची तयारी सुरू केली होती. ही बाब नक्षल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना छत्तीसगड राज्यातील अंबुजमाड येथे पाठविण्यात आले होते. मात्र नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता या जोडप्याने बुधवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सुक्कूवर १२ लाखांचे तर गिरीजावर ६ लाखांचे बक्षीस होते. या बक्षिसांचा लाभ त्यांना दिला जाईल. (प्रतिनिधी)