जयश्रीला डांबणाऱ्या 'त्या' नऊ जणांचे आत्मसमर्पण
By admin | Published: July 29, 2016 05:39 PM2016-07-29T17:39:12+5:302016-07-29T17:39:12+5:30
जयश्री दुधे यांच्यावर झालेल्या अत्याचारप्रकरणी गुरुवारी सासरच्या नऊ जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. माहूर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले
वैभव बाबरेकर
अमरावती, दि. २९ : जयश्री दुधे यांच्यावर झालेल्या अत्याचारप्रकरणी गुरुवारी सासरच्या नऊ जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. माहूर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. माहूर येथील सासरच्या मंडळींनी जयश्री दुधे यांना अंधाऱ्या खोलीत अन्न-पाण्याविना डांबून अत्याचार केलेत.
त्यानंतर तिला कुऱ्हा येथील माहेरी आणून टाकले होते. तिच्या आई-वडिलांनी अत्यवस्थेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जयश्रीवरील अत्याचाराला 'लोकमत'ने वाचा फोडल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. तत्काळ पोलीस यंत्रणांनी दखल घेऊन आरोपींविरुद्ध कारवाईला सुरूवात केली.
कुऱ्हा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदवून प्रकरण माहूर पोलिसांच्या स्वाधीन केले. माहूर पोलिसांनीही अमरावती येथे येऊन जयश्रीसह तिचे आई-वडील व अन्य नागरिकांचे बयाण नोंदविले. या प्रकरणातील आरोपी सासरा लक्ष्मण नारायण दुधे, सासू सोनुबाई लक्ष्मण दुधे, दीर संजय लक्ष्मण दुधे, वैशाली संजय दुधे, रवि लक्ष्मण दुधे, उज्ज्वला रवि दुधे, सचिन दुधे, प्रतीक्षा सचिन दुधे व अमर लक्ष्मण दुधे यांचा शोध माहूर पोलीस घेत होते.
दरम्यान गुरूवारी नऊ आरोपींनी माहूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी नऊ जणांना अटक करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर.के.पुरोहित यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी व बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी नऊ आरोपींची नांदेड येथील कारागृहात रवानगी केली आहे. कोट जयश्रीवरील अत्याचार प्रकरणात सासरचे नऊ जण स्वत:हून पोलीस ठाण्यात आले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केल्याने न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. - ए.एन.चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, माहुर पोलीस ठाणे