सरीवर सरी; ऊन, दमदार पाऊस आणि गारवा...
By Admin | Published: June 10, 2017 01:28 AM2017-06-10T01:28:43+5:302017-06-10T01:28:43+5:30
वेगवान वाटचाल करत मान्सून गुरुवारी राज्यात दाखल झाला असतानाच मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारसह शुक्रवारी पडलेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वेगवान वाटचाल करत मान्सून गुरुवारी राज्यात दाखल झाला असतानाच मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारसह शुक्रवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी मुंबईकरांना सुखद दिलासा दिला आहे. गुरुवारी रात्रभर कोसळलेल्या दमदार पावसामुळे मुंबापुरीत चांगलाच गारवा निर्माण झाला असून, शुक्रवारी दुपारसह सायंकाळी पडलेल्या पावसाने गारव्यात आणखी भर घातली आहे.
दरम्यान, मान्सून आगेकूच करत असतानाच शनिवारसह रविवारी मुंबापुरीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. परिणामी उकाड्याने हैराण मुंबईकर दमदार पावसाने आता चांगलेच सुखावणार आहेत.
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,
शुक्रवारी नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणाच्या, अंतर्गत कर्नाटकाच्या, रायलसीमाच्या व आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे.
मागील २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असतानाच मुंबईतही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत.
गुरुवारी रात्री मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी किंचितशी बरसात केली. त्यानंतर आकाश मोकळे झाल्याने पडलेल्या प्रखर सूर्यकिरणांनी मुंबईकरांना अक्षरश: घाम फोडला. आणि पुन्हा दुपारी दाटून आलेल्या ढगांनी दुपारसह सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली.
सायंकाळी झालेल्या पावसामुळे मुंबईत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. एकंदर उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व दमदार सरींनी दिलासा दिला असून, पडलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले आहेत. आता असाच पाऊस पडत राहो, अन्यथा पुन्हा उकाडा सुरू होईल का, अशी आशंका वाटत असल्याचे मत काही मुंबईकरांनी व्यक्त केले.