सरींचा जोर कायम; पुढचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:38 AM2017-07-19T04:38:58+5:302017-07-19T06:24:02+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी रौद्ररूप धारण केलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने सकाळपासून

Surrey's force prevails; The possibility of heavy rain in the next two days in Mumbai | सरींचा जोर कायम; पुढचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

सरींचा जोर कायम; पुढचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी रौद्ररूप धारण केलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने सकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार झोडपून काढले. दुपार आणि सायंकाळच्या तुलनेत सकाळी सर्वत्र पावसाचा जोर जास्त होता. पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने वसई-विरार, डहाणू, बोर्डी, मनोर या परिसरात पूरस्थिती ओढावली होती. तर वसईतील बारा गावांचा संपर्क तुटला आहे.
कुलाबा येथे १०७.२ आणि सांताक्रूझ येथे १६३.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पुढील ४८ तासांसाठी मुंबईत अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मंगळवारी सकाळी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारसह सायंकाळी मात्र पावसाचा वेग मंदावला. मुंबई शहर आणि उपनगरात कोठेही पाणी साचले नसले तरी प्रत्यक्षात मात्र रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला होता. महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात तीन, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण सहा ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. शहरात पाच, पूर्व उपनगरात चार आणि पश्चिम उपनगरात सहा अशा एकूण पंधरा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात सोळा, पूर्व उपनगरात सतरा आणि पश्चिम उपनगरात चौदा अशा एकूण ४७ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
दरम्यान, मुंबई शहरात भायखळा, कुलाबा, दादर, धारावी, वरळी, पूर्व उपनगरात चेंबूर, कुर्ला, पवई, विक्रोळी आणि पश्चिम उपनगरात अंधेरी, बीकेसी, बोरीवली, दिंडोशी, गोरेगाव, मालाड येथे शंभर ते दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे महापालिका नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
रायगड जिल्ह्यालाही संततधार पावसाने झोडपून काढले आहे. अंबा, सावित्री, कुंडलिका नद्यांची जलपातळी सोमवारी सायंकाळी पूर रेषेजवळ पोहोचल्याने नदी किनाऱ्याच्या सुमारे २४५ गावांतील ग्रामस्थांनी रात्र जागूनच काढली. मात्र पहाटेच्या सुमारास पाणी ओसरू लागल्याने ग्रामस्थांनी नि:श्वास टाकला असून पुराचा धोका आता पूर्णपणे टळला आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा काही परिणाम झाला नसल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात आतापर्यंत १८९६.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे
धरणाची जलपातळी ८२ मीटर
इतकी नोंदविण्यात आली
आहे. उरणमधील रानसई
धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. याशिवाय पनवेल परिसरातील देहरंग धरणाची पातळीही वाढली आहे. शहरात १९२ झाडांची पडझड झाल्याची नोंद आहे.
ठाणे जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. अंबरनाथला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरणही ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणात ८० टक्के, भातसात ७२ टक्के आणि आंध्रा धरणात आतापर्यंत ५२ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तिप्पट पाणीसाठा या धरणांमध्ये झाला आहे. कालपासून पडणाऱ्या पावसामुळे भिवंडीच्या कामवारी नदीला पूर आल्याने अनेक गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. शाई, काळू या नद्यांनाही पूर आला आहे.
संपूर्ण पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने वसई-विरार, डहाणू, बोर्डी, मनोर या परिसरात पूरस्थिती ओढावली होती. मुंबई-अहमदाबाद मार्गावर पाणी साठल्याने प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तिचा परिणाम अन्य ठिकाणी कोंडी होण्यात झाला. असंख्य पूल आणि रस्ते पुराखाली गेल्यामुळे अनेक गावांचा, शहरांचा परस्परांशी संपर्क तुटला होता. पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या तालुक्यांत त्यामानाने पुराचा जोर फारसा नव्हता. बोर्डी परिसरासह गुजरात राज्याला पावसाने झोडपल्याने मंगळवार, १८ जुलै रोजी पश्चिम रेल्वेच्या बलसाड रेल्वे स्थानकातील रूळ पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने डहाणूसह पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली.

कोकण, गडचिरोलीत अतिवृष्टीने नद्यांना पूर
मुंबई/पुणे : राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यासह विदर्भातील गडचिरोली तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोकणातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.


तानसा तलाव भरला
जोरदार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांसाठी खूशखबर आणली आहे. मोडक सागरपाठोपाठ दोनच दिवसांत तानसा तलावही भरून वाहू लागला आहे. मुसळधार पावसामुळे सर्वच तलावांमध्ये एकूण २७४ दिवसांचा जलसाठा जमा झाला आहे.
मंगळवारी संध्याकाळी तानसा तलाव भरून वाहू लागला. या तलावातून मुंबईला रोज ५३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अन्य तलावांमध्ये मिळून १० लाख २८ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा झाला आहे.

शेती पाण्याखाली
पालघर : तानसा नदीला आलेल्या
पुरामुळे भाताणे-पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई तालुक्यातील बारा गावांचा
संपर्क तुटला आहे. भाताणे, नवसई, थळ्याचा पाडा, आडणे, जांभूळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा या बारा गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो हेक्टर भातशेती पाण्यातच आहे. डहाणू तालुक्यात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.

Web Title: Surrey's force prevails; The possibility of heavy rain in the next two days in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.