पुरातत्त्वकडून खंडोबा गडाची पाहणी
By admin | Published: June 17, 2015 10:36 PM2015-06-17T22:36:06+5:302015-06-17T22:36:06+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या प्राचीन खंडोबा मंदिराची पुणे येथील डेक्कन कॉलेज संशोधन संस्थेच्या पथकाने पाहणी केली.
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या प्राचीन खंडोबा मंदिराची पुणे येथील डेक्कन कॉलेज संशोधन संस्थेच्या पथकाने पाहणी केली. लवकरच याबाबत ते खंडोबा गडाच्या सद्य:स्थितीविषयी लेखी स्वरूपात देवस्थानाला अहवाल सादर करणार आहेत. यामध्ये प्राचीन मंदिराची सध्याची अवस्था व ते जतन करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती असणार आहे.
डेक्कन कॉलेजचे कुलगुरु प्रा. वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरापर्यावरण तज्ज्ञ प्रा. पी. डी. साबळे, मूर्ती व मंदिर तज्ज्ञ प्रा. प्रमोद दंडवते, भारतीय पुरातत्त्व विभागातील जतन व संवर्धन तज्ज्ञ मॅनेजर सिंग, अभियांत्रिकी कॉलेजचे डॉ. एम. एस. रणदिवे, बालाजी गाजुल, नीलम ढापरे यांनी गडाची दोन दिवस पाहणी केली. या वेळी मार्तंड देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त वसंत नाझीरकर उपस्थित होते.
या पथकाने यापूर्वी आळंदी, पंढरपूर व राज्यातील विविध प्राचीन लेण्यांची पाहणी करून ऐतिहासिक वास्तू वाचविण्यासाठी योग्य मार्गदर्शन केलेले आहे. जेजुरीचा खंडोबा गड हे मराठेशाहीचे दैवत असल्याने त्याची रचना किल्ल्यासारखी आहे. मूळ मंदिराचा गाभारा व सभामंडप हेमाडपंती असून, त्याचे बांधकाम आठव्या ते दहाव्या शतकातले आहे. गेल्या १५ वर्षांपासून या सभामंडपाच्या छताला असलेल्या दगडी तुळयांना तडे गेलेले असून, पावसाळ्यात त्यातून पाण्याची गळती होते. या धोकादायक छताची तातडीने दुरुस्ती होण्याची आवश्यकता आहे. तर, बाहेरील दगडी तटबंदी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधल्याचा इतिहास आहे. या तटबंदीमधील ओवऱ्यांमध्ये व अर्ध्या वाटेवर असलेल्या बानूदेवीच्या मंदिरामध्येही पाणी गळते.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे पाच कोटी रुपये खर्चून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्राचीन मंदिर जतन करण्यासाठी तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याची दखल घेऊन खंडोबा देवस्थान समितीने तातडीने पुरातत्त्व तज्ज्ञांचे पथक बोलावून मंदिर जतन करण्यासाठी विशेष विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
पुरातन खंडोबा मंदिराच्या दगडांची- दीपमाळांची मोठ्या प्रमाणात ऊन, पाऊस, वाऱ्यामुळे झीज झालेली असून, वेळीच योग्य उपाययोजना केली नाही तर या मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. (वार्ताहर)