ब्रिटीशकालीन कळवा पुलाचे सर्वेक्षण सुरु
By Admin | Published: June 12, 2014 04:22 AM2014-06-12T04:22:26+5:302014-06-12T04:22:26+5:30
ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचा सर्व्हे करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे.
ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचा सर्व्हे करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे. दोन आठवडे हा सर्व्हे सुरू राहणार असून, त्यानंतर हा पूल वाहतुकीस योग्य आहे अथवा नाही याचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतरच या पुलावरून चारचाकी वाहनांना प्रवेश द्यायचा अथवा नाही, हेसुद्धा स्पष्ट होणार असल्याचे पालिकेने म्हटले.
कळव्याला ठाण्याशी जोडण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या पुलाची निर्मिती केली होती. दगडांचा वापर करून हा पूल उभारण्यात आला आहे. परंतु दीड वर्षापूर्वी या पुलाच्या बुरुजाचे काही दगड निखळू लागल्याने तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर, या पुलाला काहीशी डागडुजी करून हा पूल वाहतुकीस योग्य आहे अथवा नाही, याची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणावरून दुचाकी आणि तीनचाकी अशा हलक्या वाहनांना प्रवेश खुला करण्यात आला आहे.
आता महापालिकेने या पुलाचा सर्व्हे करण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारपासून या कामाला सुरुवात झाली असून यासाठी दिल्ली मेड कंपनी आणि आयआयटी रोडकी यांच्या माध्यमातून या पुलाच्या खालच्या बाजूस सेन्सर बसवण्यात आले आहेत. यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या सेन्सरमध्ये या पुलावरून चारचाकी वाहने जाऊ शकतात का, याचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी दुपारच्या वेळेस चारचाकी वाहनांना या पुलावरून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचाही अभ्यास केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दोन आठवड्यांनंतर या पुलाची वाहन क्षमता लक्षात घेतली जाणार आहे. त्यानंतर, चारचाकी वाहनांसाठी हा पूल सक्षम आहे का, याचा अहवाल दिला जाणार आहे. या अहवालातून हा पूल वापरास योग्य आहे अथवा नाही, याची माहिती समोर येईल. (वार्ताहर)