हावडा-मुंबई हायस्पीड रेल्वेसाठी सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 03:54 AM2016-03-10T03:54:12+5:302016-03-10T03:54:12+5:30
हावडा ते मुंबई या दरम्यान हायस्पीड रेल्वे चालवता येऊ शकते का? याच्या चाचपणीसाठी स्पेनच्या पथकाने बुधवारी जळगाव व भुसावळ येथे सर्व्हे केला.
जळगाव : हावडा ते मुंबई या दरम्यान हायस्पीड रेल्वे चालवता येऊ शकते का? याच्या चाचपणीसाठी स्पेनच्या पथकाने बुधवारी जळगाव व भुसावळ येथे सर्व्हे केला.
हावडा ते मुंबई दरम्यानच्या हायस्पीड रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात हावडा ते नागपूर व दुसऱ्या टप्प्यात नागपूर ते मुंबई या मार्गांचा समावेश आहे. या कामासाठी रेल्वे बोर्डाने स्पेनच्या ‘एडीआयएफ’ कंपनीला ठेका देण्यात आला आहे. या कंपनीचे एक त्रिसदस्यीय पथक भारतात आले आहे. यात अल्बर्टाे मॉस्टेइरो, फ्रान्सिस्को व कार्लोस यांचा समावेश आहे.
हायस्पीड रेल्वेसाठी हावडा ते नागपूर पर्यंतच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आता नागपूर ते मुंबई दरम्यानच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या पथकाने ८ मार्चला नागपूरपासून अमरावती व अकोला रेल्वेस्थानकांवर सर्वेक्षण केले. त्यानंतर बुधवारी भुसावळ व जळगाव स्थानकांवर सर्वेक्षण झाले. तर गुरुवारी हे पथक सर्वेक्षणासाठी औरंगाबादला जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)