विधानसभेला मविआ करणार लोकसभेची पुनरावृत्ती? महायुतीला किती जागा मिळणार? सर्व्हेचा अंदाज काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:52 AM2024-08-23T11:52:02+5:302024-08-23T11:54:58+5:30

Maharashtra Assembly Eletion 2024: आता विधानसभा निवडणुका झाल्यास महायुतीला किती जागांवर समाधान मानावे लागेल? महाविकास आघाडी किती जागांवर बाजी मारेल? सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी जाणून घ्या...

survey of maharashtra assembly election 2024 who will be the game changer and how many seats likely to win maha vikas aghadi and mahayuti | विधानसभेला मविआ करणार लोकसभेची पुनरावृत्ती? महायुतीला किती जागा मिळणार? सर्व्हेचा अंदाज काय?

विधानसभेला मविआ करणार लोकसभेची पुनरावृत्ती? महायुतीला किती जागा मिळणार? सर्व्हेचा अंदाज काय?

Maharashtra Assembly Eletion 2024: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निकालाच्या आधारावर महाविकास आघाडीतील नेते जागावाटप करण्यावर भर देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच महायुतीचे जागावाटप कसे होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच एक सर्व्हे घेण्यात आला असून, यातील आकडे धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असा कयास बांधला जात आहे. राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होतील, अशी चर्चा सुरू आहे. यातच सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील? कोणाला किती टक्के मते मिळतील, याबाबतचा नवा सर्व्हे समोर आला आहे. इंडिया टुडे-सी व्होटर्सचा मुड ऑफ नेशन सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी पाहायला मिळत आहे. 

विधानसभेला मविआ करणार लोकसभेची पुनरावृत्ती? महायुतीला किती जागा मिळणार?

या सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४३.७१ टक्के मते मिळाली होती, तर महायुतीला ४३.५५ टक्के मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला बाजी मारू शकेल, असा सर्व्हेचा अंदाज आहे. महाविकास आघाडीला १५० ते १६० जागा मिळू शकतात. तर महायुतीला १२० ते १३० जागांपर्यंत मजल  मारु शकते, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर, महायुतीला ४२ टक्के मते मिळू शकतात. तर, महाविकास आघाडीला ४४ टक्के मते मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बसणार?

मराठा आरक्षणाचा मुद्दाही महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे. यातच ओबीसी आरक्षण टिकावे, यासाठीही आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फायदा झाला, असे महाविकास आघाडीच्या खासदारांनी सांगितले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा फटका कुणाला बसणार तसेच मनोज जरांगे पाटील स्वतः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ ३.१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असली तरी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, शेतकरी नेते राजू शेट्टी, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि प्रहारचे बच्चू कडू यांसारख्या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु आहे. त्यामुळे तिसरी आघाडी झाल्यास अनेक मतदारसंघांमध्ये ३ ते ४ उमेदवार उभे राहू शकतात, याचा फटका कोणाला बसणार हे पाहाणे देखील महत्वाचे ठरणार आहे. 
 

Web Title: survey of maharashtra assembly election 2024 who will be the game changer and how many seats likely to win maha vikas aghadi and mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.