"शिवसेना ९५ जागा जिंकेल हा सर्व्हे प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना दिला होता"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:38 PM2023-01-28T13:38:54+5:302023-01-28T13:39:23+5:30
महाविकास आघाडीतील मतभेद टोकाला आलेले आहेत. आता हे एकमेकांशी फारकत घेण्याच्या मनस्थितीत आले आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
मुंबई - कुठल्याही एजन्सीने दिलेला सर्व्हे हा परिपूर्ण नसतो. सर्व्हे हा निवडणुकीपूर्वी झालेला असतो. निवडणुकीसाठी महिना-सव्वा महिना राहिलेला असताना केलेले सर्व्हे एखाद्यावेळेस पुढे-मागे होतात. मागच्या वेळी प्रशांत किशोर याला उद्धव ठाकरेंनी काम दिले होते. शिवसेनेला ९५ जागा मिळतील असा सर्व्हे त्याने दिला होता. आम्ही त्याच अर्विभावात होतो आम्हाला ९५ जागा मिळणार आहेत. जिथून मी निवडणूक लढतो ती जागा पडणार आहे असा सर्व्हे दिला होता. उद्धव ठाकरेंनी मला सांगितले. पण याच ठिकाणी मी सर्वाधिक मतांनी निवडून आलो असं विधान शिंदे गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, सर्व्हेवर अंदाज बांधायचे असं नसतं. शरद पवारांच्या एका पावसाच्या सभेने सगळे सर्व्हे गुंडाळून टाकले होते. पश्चिम महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार झाले. सर्व्हे अंदाज हा त्यांच्या मनाच्या समाधानासाठी चांगला आहे. संजय राऊतला अत्यंत आनंद झाला असेल. कारण हा माणूस माणसांत राहत नाही. भांडूप व्हाया मातोश्री प्रभादेवी इथे बसणारा माणूस या सर्व्हेवर बोलायला लागलाय. ज्याला काही माहिती नाही जो कशावरही बोलतो. प्रकाश आंबेडकरांनी राऊतांना त्यांची जागा दाखवली. काल जे खुर्ची लावून शेजारी बसले होते. त्यांनी म्हटलं कोण संजय राऊत मी ओळखत नाही. लायकी ओळखा. पातळी पाहून विधान करा असंही त्यांनी म्हटलं.
महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाही
चारही पक्षात मतभिन्नता आढळून येतेय मग सर्व्हेचे काय होईल. वंचित-ठाकरे गट युती झाली ती किती काळ चालेल याची कल्पना नाही हे स्टेटमेंट मी पहिल्याच दिवशी केले होते. २ दिवस झाले. अजून निवडणुका यायच्यात. लोकसभा निवडणुका दूर आहेत. जेव्हा महापालिका निवडणुका येतील तेव्हा यांच्यातील मतभेद उफाळून येणार आहेत. महाविकास आघाडीतील मतभेद टोकाला आलेले आहेत. आता हे एकमेकांशी फारकत घेण्याच्या मनस्थितीत आले आहेत. लवकरच या आघाडीची बिघाडी होणार आहे. ही महाविकास आघाडी अस्तित्वातच राहणार नाही असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.