सुटीविना चालते जिल्हा परिषद शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 01:43 AM2017-06-19T01:43:03+5:302017-06-19T01:43:03+5:30
औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष दिले असून, गेल्या १७ महिन्यांपासून ही शाळा सुटीविना सुरू आहे
आशपाक पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष दिले असून, गेल्या १७ महिन्यांपासून ही शाळा सुटीविना सुरू आहे. पहाटे ५.३० वाजेपासूनच विद्यार्थ्यांच्या दिनचर्येला प्रारंभ होतो.
इंग्रजी शाळांचे ग्रामीण भागात आव्हान असतानाही औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे या शाळेत आजही जवळपास ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक कवी भारत सातपुते हे ११ जानेवारी २०१६ रोजी भादा
जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्यापासून त्यांनी सुटीविना शाळा सुरू केली. त्यांच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसादही भरभरून आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर व्यायाम, योगासन, मल्लखांब, कुस्ती आदींचे धडेही विद्यार्थ्यांना दिले जातात. पहाटे ५.३० वाजता शाळेच्या प्रांगणात जमलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सातपुते हे मार्गदर्शन करतात. जवळपास एक तास विद्यार्थी योगासन व व्यायामासाठी देतात. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ झाले असून, आजारांपासून बचाव झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
व्यायामाची वाढली गोडी
शाळेतील मुला-मुलींमध्ये व्यायामाची गोडी वाढली आहे. त्यामुळे भल्या पहाटे बहुतांश विद्यार्थी शाळेत हजर असतात. याशिवाय मुलींसाठी गावात ६ ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणीही मुलींची संख्या लक्षणीय आहे.