विषाणू संसर्ग उठतोय हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर

By admin | Published: September 1, 2016 03:43 PM2016-09-01T15:43:38+5:302016-09-01T15:43:38+5:30

जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून होणारा विषाणू संसर्ग जंगलातील अतिसंरक्षीत भागातील बिबट सारख्या हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर उठत आहे.

The survival of the viral infection of the wild beast | विषाणू संसर्ग उठतोय हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर

विषाणू संसर्ग उठतोय हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर

Next
>अतुल जयस्वाल
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 1 -  जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून होणारा विषाणू संसर्ग जंगलातील अतिसंरक्षीत भागातील बिबट सारख्या हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर उठत आहे. अकोला-वाशिम वनविभागातील मालेगाव परिक्षेत्रात गत महिनाभराच्या कालावधीत दोन बिबटांचा मृत्यू विषाणू संसर्गामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्याचे लसीकरण करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहेत.
अन्न साखळीमधील सर्वोच्च पातळीवर वाघ, बिबट हे मार्जरवर्गीय प्राणी आहेत. या प्राण्यांचे अस्तित्व जंगलातील अन्नसाखळी संतुलीत राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जंगलातील वातावरण अत्यंत शुद्ध व प्रदूषण विरहित असल्यामुळे हे प्राणी सहजासहजी आजाराला बळी पडत नाहीत. परंतु, जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून आता जंगलातील हिंस्त्र श्वापदांमध्ये विषाणू संसर्ग होत असल्याचे गत महिनाभरात झालेल्या घटनांमध्ये पुढे आले आहे. मालेगाव परीक्षेत्रामध्ये वाशिम जिल्ह्यातील कवरदरी शिवारात २५ जुलै रोजी अडीच वर्षाच्या बिबटाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. उपासमार व ट्रिपॅनोसोमा या घातक आजारांच्या विषाणूंची लागण झाल्यामुळे या बिबटाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर २५ आॅगस्ट रोजी याच परिक्षेत्रात कोळेगाव शिवारात तीन वर्षाची मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. गर्भार असलेल्या या मादीचा मृत्यूही विषाणूसंसर्गामुळे झाल्याचे समोर आले. जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांना पावसाळ्यात विविध प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होऊन ती आजारी पडतात. अशी आजारी जनावरे जंगलात गेल्यास त्यांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रसार होतो. यामुळे हिंस्त्र श्वापदांना विषाणूंची लागण होण्याची दाट शक्यता असते. 
 
अकोला-वाशिम वनविभागात उरले पाच बिबट
अकोला-वाशिम वनविभागात एकून सात बिबट असल्याची माहिती आहे. यापैकी दोन बिबटांचा मृत्यू झाल्यामुळे आता केवळ पाच बिबटच शिल्लक आहेत. विषाणूंचा संसर्ग असाच होत राहिला, तर या पाच बिबटांचे अस्तित्वही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वन्यजीव विभागाच्यावतीने जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव प्राण्यांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
हिंस्त्र श्वापदांना विषाणू संसर्ग होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत घेऊन जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव प्राण्यांचे लसीकरण तसेच इतर उपाययोजना करू. 
 - प्र. ज. लोणकर उवनसंरक्षक, प्रादेशिक वनविभाग, अकोला.

Web Title: The survival of the viral infection of the wild beast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.