सूर्यनमस्काराचा वाद चिघळला
By admin | Published: August 27, 2016 01:58 AM2016-08-27T01:58:54+5:302016-08-27T01:58:54+5:30
सूर्यनमस्कार सक्तीचा करण्यावरून वाद पेटला असताना प्रत्यक्षात महिन्याभरापूर्वीच विद्यार्थी दररोज सकाळी सूर्यनमस्कार घालत असल्याचे उजेडात आले
मुंबई : पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार सक्तीचा करण्यावरून वाद पेटला असताना प्रत्यक्षात महिन्याभरापूर्वीच विद्यार्थी दररोज सकाळी सूर्यनमस्कार घालत असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे हा विरोध राजकीय असल्याचे स्पष्ट झाल्याने समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी आता शिक्षण अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी सुरू केली आहे़
पालिका शाळांमध्ये दररोज प्रार्थनावेळी योगा आणि सूर्यनमस्कार सक्तीचा करण्याची भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांची ठरावाची सूचना महासभेत नुकतीच बहुमताने मंजूर झाली़ यावर समाजवादीसह सर्व विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला़ समाजवादी पक्षाने यापुढे जात हा निर्णय रद्द
होण्यासाठी दबावतंत्र सुरू केले़ मात्र महापालिका शाळांमध्ये २६ जुलैपासून योगाचे प्रशिक्षण दैनंदिन परिपाठ म्हणून सुरू करण्यात आल्याचे समोर आले़
असे परिपत्रकच शिक्षण अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी पालिका शाळांना पाठविले होते़ माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून काही शाळांमध्ये सकाळच्या वेळी काही आसने शिकविली जातात़ विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत योगाचे प्रशिक्षण दिले जाते़ याला आतापर्यंत कधीही विरोध होत नव्हता, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले़ (प्रतिनिधी)
>आयुक्तांना समाजवादीची नोटीस
मुस्लीम धर्मीयांचा सूर्यनमस्काराला विरोध आहे, अशी सक्ती मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी कायदेशीर नोटीस सपाने आयुक्त अजय मेहता यांना पाठविली़ या नोटिशीला सात दिवसांमध्ये सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास न्यायालयीन लढाई लढू, असा इशाराच सपाचे गटनेते यांनी वकिलांमार्फत दिला आहे़
निलंबनाची मागणी : शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी गेल्या महिन्यातच परिपत्रक काढून सूर्यनमस्कार पालिका शाळांमध्ये सक्तीचे केले़ गेला महिनाभर विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत असताना विरोध झाला नाही़ ही बाब उघडकीस येताच सपाचे गटनेते रईस शेख यांनी आता शिक्षण अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे़
एक लाख विद्यार्थ्यांवर परिणाम : पालिकेच्या चारशे उर्दू माध्यमातील एक लाख विद्यार्थ्यांनाही सूर्यनमस्काराची सक्ती केली आहे़ सूर्यनमस्काराला मुस्लीम धर्मीयांचा विरोध असल्याने या विद्यार्थ्यांवर हा अन्याय का, असा सवाल सपाने केला आहे़
वाद पेटणार : पालिका शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना दर शुक्रवारी खादी वस्त्र परिधान करण्याची सक्तीचा ठराव भाजपाचे राम बारोट यांनी मांडला आहे़ त्याचबरोबर प्रत्येक विभागात गोशाळा बांधणे अशाही काही मागण्यांवरून वाद पेटण्याची शक्यता आहे़
>नगरसेवकांनाही सूर्यनमस्काराची सक्ती
- मनसेची मागणी
पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्काराची सक्ती करण्याचा वाद पेटला असताना ऐन निवडणुकीच्या काळात या वादातून आपलीही पोळी शेकून घेण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले आहेत़ विद्यार्थ्यांबरोबरच आता नगरसेवकांनाही प्रत्येक महिन्यात पाच दिवस सूर्यनमस्कार घालण्याची सक्ती करावी, अशी मागणी मनसेने केली आहे़
विद्यार्थ्यांना सक्ती करताना नगरसेवकांनाही याची जाण असायला हवी, म्हणून ही मागणी करण्यात आल्याचा युक्तिवाद मनसेने केला आहे़ प्रत्येक नगरसेवकाने आपल्या विभागातील पालिका शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांबरोबर पाच दिवस सूर्यनमस्कार घालावा़ हा नियम न पाळणाऱ्या नगरसेवकाला निलंबित करण्याचीही मागणी मनसेने
केली आहे़