Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूतप्रकरणी उर बडवणारे आता कुठे गेले?; महाविकास आघाडीचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 02:28 AM2020-10-05T02:28:08+5:302020-10-05T06:49:09+5:30
Sushant Singh Rajput Case: एम्सच्या अहवालानंतर नेटिझन्स आक्रमक; महाराष्ट्र पोलीस ट्रेंडिंगमध्ये
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर एम्सच्या अहवालानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुशांत प्रकरणावरून उर बडवून घेणारे, महाराष्ट्राची बदनामी करणारे आता कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित करतानाच भाजप, रामदास आठवले, अभिनेत्री कंगना रनौतने जाहीर माफी मागावी, अशी मागणी होत आहे.
सुशांत प्रकरणात दिल्लीतील एम्समधील डॉक्टरांनी आपला अहवाल सीबीआयला दिला. अहवालानुसार, सुशांतसिंहची हत्या नसून आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता, यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. या मुद्द्यावरून उर बडवणारे, शिवसेनाला लक्ष्य करणारे आता कुठे आहेत, रामदास आठवले, कंगनावर बोलत होते, हाथरस प्रकरणी रामदास आठवले यांचे मौन का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
काही वृत्त वाहिन्या, भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता ते ‘मराठी भैय्ये’ माफी मागणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. राजकारणासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नाव घेऊन कोणी कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची सुज्ञ जनता या हीन राजकारणाला भुलणार नाही, असे टिष्ट्वट आमदार रोहित पवार यांनी केले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे कारस्थान उघडे पडल्याचा दावा केला.
महाराष्ट्र पोलीस ट्रेंडिंगमध्ये
एम्सच्या अहवालानंतर टिष्ट्वटरवर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान असल्याचा टिष्ट्वटर ट्रेंड सुरू आहे. दिवसभर हजारो नेटिझन्सनी राज्यातील पोलिसांचे विविध फोटो शेअर करत ट्रेंड कायम ठेवला.